माजी सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा
By admin | Published: January 13, 2017 02:04 AM2017-01-13T02:04:37+5:302017-01-13T02:04:37+5:30
ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनी सन २०११-१२ या
यवत : ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनी सन २०११-१२ या आर्थिक वर्षात सुमारे ८ लाख रुपयांचा ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे.
तत्कालीन सरपंच श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनी ग्रामपंचायत दप्तरी अनियमितता ठेवत निधीचा अपहार केल्याची तक्रार दौंड तालुका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष उत्तम गायकवाड व शब्बीर सय्यद यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे केली होती.
या प्रकरणावर त्यावेळी शासकीय पातळीवर चौकशी होऊन सरपंच शेंडगे दोषी आढळल्याने त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले होते, तर ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय केकाण यांच्यावर खातेअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
यवत ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराचे सदर प्रकरण तालुक्यात चांगलेच गाजले होते. मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार ग्रामपंचायतीमध्ये झाल्याच्या आरोपांमुळे त्यावेळचे सत्ताधारी व विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच संघर्ष झाला होता. मात्र, चौकशी मध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी दोषी आढळल्याने सत्ताधारी गटावर नामुष्की ओढावली होती.
विभागीय आयुक्त, ग्रामविकास मंत्री व मुंबई उच्च न्यायलयात देखील या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दाद मागितली होती. मात्र, अखेरीस मुंबई उच्च न्यायालयानेदेखील ग्रामपंचायत निधीमध्ये आर्थिक अनियमितता व अपहार झाल्याचा ठपका संबंधितांवर ठेवला होता. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्याने सरपंच शेंडगे यांना पदावरून बडतर्फच राहावे लागले होते. अखेर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतरदेखील याबाबतची चौकशी सुरु होती.
(वार्ताहर)
२०११-१२ वर्षातील घटना : लेखापरीक्षणात आढळली अनियमितता
यवत ग्रामपंचायतीचे सन २०११-१२ मध्ये मा.सहायक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण झाले होते. त्याबाबत त्यांनी सदर आर्थिक वर्षात सरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता, नियम बाह्यता, आर्थिक तफावत, बँक पासबुक व बँकेच्या ताळमेळ न घेतल्याने विशेष लेखापरीक्षणात वसूल पात्र रकमा, अनपेक्षित रकमा, लेखापरीक्षणात अमान्य रकमा घेतल्याचा अहवाल दिला आहे. त्याप्रमाणे गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांनी त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा लेखी आदेश विस्तार अधिकारी (पंचायत) यांना दिल्यानंतर त्यांनी काल (दि.११) रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सन २०११ - १२ या आर्थिक वर्षात यवत ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून श्यामराव शेंडगे व ग्रामविकास अधिकारी म्हणून दत्तात्रय बाबूराव केकाण कार्यरत असल्याने त्यांनी दोघांनी मिळून ग्रामपंचायत निधीचा ८,१०,५७९/- रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून अपहार केल्याचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत.