गुजरवाडीतील माजी सरपंच आणि त्याचा साथीदार खून करून फरार, गुन्हे शाखेने दोघांना केली दोन दिवसात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 05:45 PM2021-05-20T17:45:17+5:302021-05-20T17:46:31+5:30
गुजरवाडीतील खुनाचा गुन्हा गुन्हे शाखेकडून उघडकीस
पुणे: कात्रज येथील गुजरवाडीमध्ये झालेल्या खुनाचा गुन्हा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उघडकीस आणला असून दोघांना अटक केली आहे. विकास रमेश चव्हाण (वय ३१, रा. गुजरवाडी, कात्रज) आणि सचिन जालिंदर डाकले (वय २९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी मोहन चौंडकर (वय ३२, रा. खलाटेनगर, मांगडेवाडी) यांचा खून केला होता. विकास चव्हाण हा हवेली तालुक्यातील पेंजर गावाचा माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. मोहन चौंडकर हा ग्रामपंचायत सदस्याच्या मामीचा सख्खा भाऊ होता. या प्रकरणी मोहन चौंडकर याची पत्नी पूजा हिने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मोहन चौंडकर यांच्या डोक्यात विटा आणि दगड मारुन खून करण्यात आला होता.
विकास चव्हाण याने मोहन चौंडकर यांना खलाटेनगर येथे एक गुंठा जमीन घेऊन दिली होती. विकास याने तेथे लाईट व इतर सुविधा उपलब्ध करुन देतो, असे सांगितले होते. परंतु, ते ती उपलब्ध करुन देऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी शेजारुन मोहन यांना लाईट व पाण्याचे कनेक्शन घेऊन दिले होते.
विकास याच्या मित्राने मोहन यांच्या शेजारीच जमीन घेतली होती. तेथे बांधकाम सुरु होते. विकास चव्हाण, सचिन डाकले व मोहन चौंडकर हे १८ मे रोजी रात्री दारु पित बसले होते. यावेळी मोहन याने त्याला लाईट व इतर सुविधा उपलब्ध करुन न दिल्याचा विषय काढला. त्यावरुन त्यांच्यात वादावादी सुरु झाली. तेव्हा विकास व सचिन यांनी शिवीगाळ करुन मोहन यांस बांधकाम साईटवरील विटांनी मारहाण करुन खून केला व ते पळून गेले होते.
या घटनेची माहिती मिळाल्यावर भारती विद्यापीठ पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत होती. खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस नाईक संजय भापकर यांना आरोपी हे शिरवळ येथे निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी शिरवळ फाटा येथे गेले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.