आंबवणेचे माजी सरपंच कराळे यांची चौकशी करा; ग्रामपंचायत सदस्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:43 IST2025-01-21T17:42:56+5:302025-01-21T17:43:16+5:30
आंबवणेच्या माजी सरपंचांचा कोट्यवधींचा घोटाळा उघड

आंबवणेचे माजी सरपंच कराळे यांची चौकशी करा; ग्रामपंचायत सदस्यांची मागणी
पुणे : मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी २०१८ ते २०२३ यादरम्यान २७ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा तसेच एकूण १० ते १२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतचे उपसरपंच नीलेश लक्ष्मण मेंगडे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुनील हुंडारे, ज्ञानेश्वर लोखरे, कोमल फाटक, अक्षरा दळवी आणि मेघा नेवासकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, मागासवर्गीय १५ टक्के निधीतील जवळपास १ कोटी २६ लाख ४० हजार ६२७ रुपये, ५ टक्के अपंग निधीतील २० लाख ५७ हजार १३७ रुपये, तसेच गावातील काँक्रीट रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या ५ कोटी ४६ लाख ८२ हजार ५४२ रुपयांत मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली असून घोटाळेबाज सरपंच कराळे यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी आंबवणे ग्रामपंचायतचे कार्यकारिणी केली आहे. १३ महिन्यांपासून सरपंचपदावर असलेल्या सरपंच मच्छिंद्र यांच्या पत्नी शिता मच्छिंद्र कराळे या हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला आहे.
सदस्यांनी सांगितले की, २०२२ मध्ये कागदोपत्री २७ लाख रुपयांचा रस्ता तयार करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तो रस्ता अस्तित्वातच नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. चौकशी अहवालात सदस्यांनी मांडलेले मुद्दे योग्य असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.