महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 08:45 PM2018-08-09T20:45:00+5:302018-08-09T20:58:36+5:30

राज्यात सर्वत्र तसेच राज्याबाहेरही अफाट जनसंपर्क असलेल्या सावंत यांनी तब्बल ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ क्रीडा पत्रकार म्हणून ठसा उमटवला.

former secretary of the Maharashtra Athletics Association Pralhad Savant passed away | महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे निधन

Next
ठळक मुद्देअ‍ॅथलेटिक्ससह राज्याच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळाग्रामीण भागातील खेळाडूंनी आॅलिम्पिकपर्यंत मजल मारण्यात सावंत यांनी मोलाचे सहकार्य अ‍ॅथलेटिक्समध्ये जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय संघटनेत विविध पदावर त्यांनी प्रभावीपणे कार्य

पुणे :  पुण्याला क्रीडानगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक प्रल्हाद सावंत यांचे गुरूवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अ‍ॅथलेटिक्ससह राज्याच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
    ६९ वर्षीय सावंत यांना दुपारी पत्रकार नगर येथील राहत्या घरी हृदयविकाराचा धक्का आला. सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सावंत हे अविवाहित होते. त्यांच्यामागे बहीण विजया मोरे, भाचा आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू रोहन मोरे, पुतणी बुलडाण्याच्या उपजिल्हाधिकारी गौरी सावंत आणि डॉ. दिव्या सावंत असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॉस्पिटल तसेच त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी नवी पेठेतील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.  
    राज्यात सर्वत्र तसेच राज्याबाहेरही अफाट जनसंपर्क असलेल्या सावंत यांनी तब्बल ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ क्रीडा पत्रकार म्हणून ठसा उमटवला. पुण्याला देशाच्याच नव्हे तर, जगाच्या क्रीडाक्षेत्रात दखल घेण्याजोगे नाव मिळवून देणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू करण्याचा मान सावंत यांनाच जातो. २००८ मध्ये पुण्यात झालेली राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा सावंत यांच्या उत्कृष्ट संयोजनामुळेच यशस्वी ठरली होती. 
कविता राऊत, ललिता बाबर यांच्यासारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी आॅलिम्पिकपर्यंत मजल मारण्यात सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले होते. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंना त्यांनी घडविले. अ‍ॅथलेटिक्समध्ये जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय संघटनेत विविध पदावर त्यांनी प्रभावीपणे कार्य केले. पुणे हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली.

Web Title: former secretary of the Maharashtra Athletics Association Pralhad Savant passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.