पुण्यातील शिंदे गटाची जबाबदारी शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:08 AM2022-07-26T09:08:38+5:302022-07-26T09:12:14+5:30
पुण्याची जबाबदारी भानगिरे यांच्याकडे...
हडपसर : पुण्यातील शिंदे गटाची जबाबदारी अखेर शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि एकनाथ शिंदे समर्थक नाना भानगिरे यांच्यावर देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात, पुण्याची जबाबदारी भानगिरे यांच्याकडे देण्यात आली असून शहर, तसेच जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून अजय भोसले यांची, तर जिल्हाप्रमुख म्हणून रमेश कोंडे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. शिंदे गटाने शिवसेनेत बंडाची भूमिका घेतल्यानंतर पुण्यातील शिवसैनिक, तसेच आजी-माजी नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला असला तरी गेली अनेक वर्षे शिवसेनेत असूनही काहीच लक्ष दिले जात नसल्याने अनेक नाराज शिवसैनिक शिंदे गटात सामील होत होते. त्याची सुरुवात भानगिरे यांच्यापासून झाली होती.
शिवसेनेसोबत असलेले भानगिरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडले, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आता पुण्याची जबाबदारी दिल्याने भानगिरे आणि भोसले यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुका लढविल्या जाणार असल्याचे चित्र आहे.
२००३ पासून पक्षात मी एकनिष्ठपणे काम केले, तर २००७ नंतर नगरसेवक असूनही पक्षाकडून मला काहीही देण्यात आले नाही. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखविल्याने मी त्यांच्या सोबतच आहे. आता त्यांनी माझ्यावर पुण्याची जबाबदारी देत पुन्हा विश्वास दाखविला असून, शहरातील अनेक पदाधिकारी, तसेच माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, लवकरच ते आमच्यासोबत असतील.
– नाना भानगिरे, शहर प्रमुख (शिवसेना शिंदे गट)