शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव माने स्वराज्य पक्षात; परिवर्तन महाशक्तीचे काम करणार
By राजू इनामदार | Published: October 23, 2024 02:24 PM2024-10-23T14:24:23+5:302024-10-23T14:25:03+5:30
शिवाजीराव माने बरोबर येण्याने परिवर्तनाच्या लढाईला मोठे बळ मिळाले आहे, संभाजीराजे छत्रपती
पुणे: हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी बुधवारी दुपारी पुण्यामध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य पक्षात प्रवेश केला. स्वराज्य पक्षाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या परिवर्तन महाशक्ती चे काम करणार असे त्यांनी सांगितले.
विधानसभेसाठी माने यांना हिंगोली, कळमनूर किंवा त्यांना हव्या असलेल्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल असे संभाजी राजे यांनी यावेळी जाहीर केले. पक्षाचे राज्य सरचिटणीस धनंजय जाधव यावेळी उपस्थित होते.
माने शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे किंवा आता एकनाथ शिंदे अशा दोघांनाही आमचे कोणतेच प्रश्न सोडवले नाहीत. कितीवेळा मागण्या केल्या, निवेदने दिली, मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळेच आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही असे लक्षात आले. छत्रपती संभाजी राजे यांनी हाक दिली. त्याला प्रतिसाद द्यायचा निर्णय सहकाऱ्यांबरोबर विचारविनिमय केल्यानंतर घेतला असे माने यांनी सांगितले. संभाजी राजे यांनी माने यांचे स्वागत केले. त्यांच्या बरोबर येण्याने परिवर्तनाच्या लढाईला मोठे बळ मिळाले आहे असे ते म्हणाले.