Madhav Godbole: माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:23 PM2022-04-25T12:23:22+5:302022-04-25T12:24:47+5:30
Madhav Godbole News: निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यामध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती गोडबोले यांच्या कुटुंबीयांनी दिली.
पुणे - निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यामध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती गोडबोले यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीना, सून दक्षिणा जावई महेश आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठी माणूस म्हणून त्यांनी दिल्लीच्या प्रशासनात आपला ठसा उमटवला होता.
१५ ऑगस्ट १९३६ मध्ये जन्मलेल्या माधव गोडबोले यांनी १९५९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना अनेक महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले होते. १९९३ मध्ये ते केंद्रीय गृहसचिव होते. तसेच माधव गोडबोले यांनी राज्याचे वित्तसचिव म्हणूनही काम पाहिले होते. माधव गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून त्यांनी विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम ए आणि पी एच डी केली. डॉ. माधव गोडबोले यांनी १९५९ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत पर्दापण केले. मार्च १९९३ मध्ये भारत सरकारचे ते केंद्रीय गृहसचिव होते. त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रात प्रधान वित्त सचिव, वीज मंडळाचे अध्यक्ष, उर्जा सचिव, उद्योग आयुक्त, तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव अशा विविध पदांवर काम केले होते.इंदिरा गांधी, नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत ते केंद्रात महत्वाच्या पदावर होते. बाबरी मशीद पडली, त्यावेळी डॉ. गोडबोले हे केंद्रीय गृहसचिव होते.
सेवानिवृत्तीनंतर गोडबोले यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, राज्याचा अर्थसंकल्प पारदर्शी व सहज समजण्याजोगा बनवण्यासाठीची एक-सदस्यीय समिती, आंध्र प्रदेश सरकारची सुशासन समिती व केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती अशा काही (यादी अपूर्ण) सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामे पाहिली.
सेवानिवृत्तीनंतर माधव गोडबोले यांनी वाचन आणि लेखनावर आपले लक्ष केंद्रित केले. माधव गोडबोलेंनी १५ हून अधिक इंग्रजी आणि तितकीच मराठी पुस्तकं लिहिली. 'अपुरा डाव' हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. त्यांनी मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र, मासिकांमधूनही सातत्याने लेखन केले.
डॉ. गोडबोले यांच्या 'जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन' या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माधव गोडबोलेंचं लेखन :
इंदिरा गांधी एक वादळी पर्व
कलम ३७०
हरवलेले सुशासन
भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा
लोकपालाची मोहिनी
भारताची धर्मनिरपेक्षता धोक्याच्या वळणावर
जवाहरलाल नेहरुंचे नेतृत्व
अपुरा डाव
प्रशासनाचे पैलू (खंड एक आणि दोन)
आस्वादविशेष
फाळणीचे हत्याकांड