Madhav Godbole Passed Away: प्रशासकीय वर्तुळातील मराठी आवाज निमाला; माधव गोडबोले यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 06:42 PM2022-04-25T18:42:28+5:302022-04-25T18:45:16+5:30
देशातील विविध उल्लेखनीय घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले माजी केंद्रीय गृहसचिव माधव दत्तात्रय गोडबोले यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले
पुणे : दिल्लीतील केंद्रीय प्रशासकीय वर्तुळात मराठी माणसाचा ठसा उमटवणारे, देशातील विविध उल्लेखनीय घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेले माजी केंद्रीय गृहसचिव माधव दत्तात्रय गोडबोले यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. एसएनडीटी महाविद्यालयाजवळच्या भक्तिमार्ग पथावर सांगाती नावाचे त्यांचे निवासस्थान होते. तिथेच त्यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला.
वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुण्यात असले तरी सार्वजनिक जीवनापासून ते अलिप्तच होते. वाचन, चिंतन, लेखन यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. प्रशासनातील काही अधिकारी सल्ला किंवा मार्गदर्शन यासाठी त्यांच्याबरोबर संपर्क साधत असत. त्यांच्याबरोबर बोलण्यात त्यांना आनंद वाटे अशी माहिती त्यांनी दिली.
दिल्लीच्या प्रशासकीय वर्तुळात गोडबोले यांनी चांगले नाव कमावले
भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९५९ च्या तुकडीचे ते अधिकारी. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्रात काम केल्यानंतर ते दिल्लीत केंद्रीय वर्तुळात काम करू लागले. बाबरी मशीद पाडली गेली, त्यावेळी ते केंद्रीय गृह सचिव म्हणून काम करत होते. त्यापूर्वी त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे सचिव आणि भारत सरकारचे नगरविकास सचिव आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकारचे प्रधान वित्त सचिव अशा विविध पदांवर काम करून लौकिक मिळवला. मनिला येथील आशियाई विकास बँकेतही त्यांनी पाच वर्षे काम केले. दिल्लीच्या प्रशासकीय वर्तुळात गोडबोले यांनी चांगले नाव कमावले. कडक शिस्तीचे व प्रशासकीय गोष्टींची सखोल माहिती असणारे अधिकारी असा त्यांचा दबदबा होता.
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व
मार्च १९९३ मध्ये प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मागील काही वर्षांपासून गोडबोले पुण्यात राहत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वाचन आणि लेखनावर आपले लक्ष केंद्रित केले. आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीवर ते पुस्तके, स्तंभलेखन यातून प्रकाश टाकत असत. त्यांनी १५ हून अधिक इंग्रजी आणि तितकीच मराठी पुस्तकं लिहिली. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. लेखनही ते या दोन्ही भाषांमध्ये करत असत. ‘जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन’ या त्यांच्या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.