दुर्गसंवर्धनाचे काम दोन वर्षांपासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:31+5:302021-06-18T04:08:31+5:30
२८ किल्ल्यांवर सुरू झाले होते काम : समिती बरखास्त केल्याने उर्वरित किल्ल्यांचे काम कसे होणार? (भाग - ३) लोकमत ...
२८ किल्ल्यांवर सुरू झाले होते काम : समिती बरखास्त केल्याने उर्वरित किल्ल्यांचे काम कसे होणार?
(भाग - ३)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील २८ किल्ल्यांवर संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, दुर्गसंवर्धनासाठी स्थापन केलेली समिती २०१९ ला बरखास्त केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून गडकिल्ले संवर्धनाचे काम ठप्प आहे. याबाबत गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून तातडीने समिती स्थापन करून पुन्हा काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
पाच वर्षांच्या काळात या समितीला बैठकीसाठी अथवा कामकाजासाठी कोणत्याही प्रकारे जागा दिली नाही. गडकिल्ल्यांवर पाहणी दौरा करण्याची समितीला परवानगी होती. मात्र, सदस्यांना कोणताही निधी दिला नाही. वर्ल्ड हेरिटेजच्या संदर्भात समितीला कुठेही विचारात घेतले जात नव्हते. ५ वर्षांत समितीच्या अंदाजे १५ बैठका झाल्या; पण त्यासाठी येण्या-जाण्याचा खर्च सदस्यांना ८ ते १० महिन्यांनंतर मिळायचा. पुरातत्त्व विभागाने या समितीबरोबर केवळ कोरीगड किल्ला हा एकच पाहणी दौरा केला आहे. त्यामुळे गडसंवर्धनासाठी शासनस्तरावरून अनास्था असल्याचे समितीतील सदस्यांचे म्हणणे आहे.
-----
दुर्गसंवर्धन समितीला कोणताही निधी किंवा मानधन दिले जात नाही. त्यामुळे समिती स्वतः एक रुपयादेखील गडकिल्ल्यांवर खर्च करू शकत नाही. तसेच काम सुरू करण्यापूर्वी त्या कामाचा आराखडा समितीकडे मंजूर करून घेणे पुरातत्त्व विभागाला बंधनकारक नव्हते. किल्ल्यांवर कोणत्या ठिकाणी प्रथम काम सुरू करावे याचा निर्णय घेण्याचा अधिकारदेखील समितीला नव्हता. त्यामुळे शासनाने गांभीर्याने या बाबींचा विचार करून नव्याने काम सुरू करताना तसे स्वातंत्र्य दिले तर गडकिल्ल्यांचे संवर्धन लवकर होण्यास मदत होईल.
- डॉ. सचिन जोशी, संशोधक, पुरातत्त्व विभाग, डेक्कन कॉलेज
------
दुर्गसंवर्धन समिती पुन्हा नेमायची किंवा पुन्हा मुदतवाढ द्यायची हा पूर्णतः राज्य शासनाचा निर्णय आहे. दुर्गसंवर्धन याबाबत नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे, आदेश बांदेकर आणि मिलिंद गुणाजी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. येणाऱ्या काळात गडसंवर्धनाची रूपरेषा ठरवून काम सुरू होईल.
- तेजस गर्गे, संचालक, पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन
------
...हे होते समितीतील सदस्य
समितीमध्ये अंदाजे वीस सदस्य होते. तेजस गर्गे हे पुरातत्त्व विभागाचे संचालक या पदावर काम करतात. तर इतर सदस्यांमध्ये डाॅ. सचिन जोशी, राजेंद्र टिपरे, चंद्रशेखर शेळके, अमर अडके, प्र. के. घाणेकर, नि. रा. पाटील, प्रमोद पाटील, मृदुला माने, योगेश शेलार व इतर काही सदस्यांचा समावेश होता.
-----
मुख्यमंत्र्यांचे दुर्गसंवर्धक, दुर्गप्रेमींना आवाहन
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडसंवर्धन उपक्रमात सहभागी होण्यासाठी दुर्गसंवर्धक, दुर्गप्रेमींना आवाहन केले आहे. याबाबत गिर्यारोहण क्षेत्रातील २५० जणांबरोबर त्यांनी नुकताच संवाद साधला आहे. त्यामुळे गडसंवर्धनासाठी शासन स्तरावरून पुन्हा लवकरच प्रयत्न होतील, अशी भावना दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.