किल्ल्यांचे भाग्य उजळणार
By admin | Published: April 18, 2017 03:08 AM2017-04-18T03:08:38+5:302017-04-18T03:08:38+5:30
राज्यातील दुर्लक्षित किल्ल्यांचे भाग्यही आता उजळणार असून, राज्य शासनाच्या गॅझेटिअर विभागातर्फे (दर्शनिका विभाग) राज्यातील ५०० ते ६०० किल्ल्यांची सविस्तर माहिती देणारे
राहुल शिंदे, पुणे
राज्यातील दुर्लक्षित किल्ल्यांचे भाग्यही आता उजळणार असून, राज्य शासनाच्या गॅझेटिअर विभागातर्फे (दर्शनिका विभाग) राज्यातील ५०० ते ६०० किल्ल्यांची सविस्तर माहिती देणारे ‘गॅझेट’ प्रसिद्ध केले जाणार आहेत. दुर्लक्षित किल्ल्यांचा ठेवा छायाचित्र व माहितीच्या रूपाने गडप्रेमींच्या समोर येणार आहे. त्याचप्रमाणे संरक्षित किल्ले म्हणून नोंदणी नसणाऱ्या ८८ किल्ल्यांच्या नोंदणीची प्रकिया सुरू झाली आहे. त्यामुळे शासनाकडून या किल्ल्यांची अधिकृतपणे काळजी घेतली जाणार आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर अधिकृत समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात विविध उपक्रम राबविले जात आहेत. याबाबत माहिती देताना ज्येष्ठ पुरातत्त्व अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले, ‘‘या समितीच्या माध्यमातून काम करताना आम्ही विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण या विभागांतील किल्ल्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून प्रथमत: १४ किल्यांची निवड केली.’’
गेल्या वर्षी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ६० कोटी रुपयांची कामे सुरू झाली, तर मार्च २०१७पासून ३० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली. किल्ल्यांवर दारूबंदी व प्लॅस्टिकबंदी करावी, अशी सूचना शासनाला करण्यात आली आहे.
तसेच, नागरिकांमध्ये किल्ले संवर्धनाबाबत जागरूकता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राज्यातील किल्ल्यांविषयी खूप त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे किल्ल्यांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे, असे नमूद करून बलकवडे म्हणाले, ‘‘राज्याच्या गॅझेटिअर विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर समितीच्या सदस्यांची बैठक झाली. तीत राज्यातील सुमारे ५०० ते ६०० किल्ल्यांची सविस्तर माहिती व किल्ल्यासंदर्भातील कागदपत्रे ‘गॅझेट’ काढून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात किल्ल्यांचा सात-बारा, ऐतिहासिक छायाचित्रे, किल्ल्यांचे महत्त्व आदी माहिती प्रकाशित केली जाणार आहे.’’