शिवराज राक्षे मेंगाई केसरीचा मानकरी; मेंगाई देवी यात्रेत राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:02 IST2025-02-26T10:02:00+5:302025-02-26T10:02:32+5:30
किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी मेंगाई देवी यात्रेनिमित्त राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी

शिवराज राक्षे मेंगाई केसरीचा मानकरी; मेंगाई देवी यात्रेत राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी
वेल्हे : मावळ्यांची स्फूर्ती देवता असलेल्या मेंगाई देवी यात्रा उत्सवानिमित्त किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी आयोजित कुस्ती आखाड्यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने भारत केसरी राहुल सिंग पंजाब यास मोळी डावावर चितपट करत मेंगाई केसरीचा किताब पटकविला.
शनिवारी (दि. २२) मेंगाई देवी कुस्ती आखाड्यामध्ये भव्य अशा कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चार वाजता सुरू झालेला कुस्ती आखाड्यामध्ये शेवटची मेंगाई केसरी किताब कुस्ती रात्री साडेअकराच्या सुमारास झाली. यामध्ये राज्यभरातून शेकडो पैलवानांसह जिल्ह्यातून तालुक्यातून हजारो कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली होती. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हर हर महादेव नावाचा जयघोष राज्यभरातून नामवंत मल्लांची हजेरी हलगीचा निनाद, आंतरराष्ट्रीय पंच भारदस्त निवेदन अशा वातावरणामध्ये कुस्ती शौकिनांनी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या पाहिल्या. कुस्ती आखाड्याचे आयोजन श्री स्वयंभू मेंगाई देवी ट्रस्ट व वेल्हे ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले होते.
पहिल्या क्रमांकाची कुस्ती व मेंगाई केसरी किताबासाठी रोख तीन लाख ५१ हजार व चांदीची गदा शिवराज राक्षे यांनी पटकावली. क्रमांक दोन नंबरची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यामध्ये झाली. यामध्ये महेंद्र गायकवाड विजय झाला. तर क्रमांक तीन नंबरच्या कुस्तीसाठी उपमहाराष्ट्र केसरी मुन्ना झुंझुरके विरुद्ध संतोष जगताप अशी लढत झाली. यामध्ये लपेट डाव टाकत मुन्ना झुंझुरके याने संतोष जगतापला चिटपट केले. या प्रमुख कुस्त्यांसाठी पंच म्हणून पैलवान संदीप रासकर पैलवान संतोष आप्पा दसवडकर, यांनी काम पाहिले. आखाड्यामध्ये प्रामुख्याने विक्रम भोसले विरुद्ध श्रीमंत भोसले, समीर शेख विरुद्ध धीरज पवार, नाथा पवार विरुद्ध संदेश शिपकुले, संग्राम पांगारे विरुद्ध माऊली टिपूगुडे, अमोल वालगुडे विरुद्ध प्रवीण हरणावळ, तन्मय रेणुसे विरुद्ध संकेत दगडे, वल्लभ शिंदे विरुद्ध चेतन बोराडे या लक्षवेधी कुस्त्या हजारो कुस्ती शोकिनांनी अनुभवल्या. या कुस्त्यांसाठी पंच म्हणून लक्ष्मण पवार जालिंदर भुरुक, करण राजीवडे, विलास पांगारे, तोडकर, भोसले, गोरक्ष भुरुक यांनी पंच म्हणून काम पाहिले.
विजेत्या पैलवानांचा सन्मान
भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते विजेत्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला आखाड्याच्या बाजूने मोठी गर्दी होत असल्याने अनेक कुस्तीशोकिनांनी शेजारी लावलेल्या स्क्रीनवर कुस्त्या पाहिल्या. कुस्ती आखाड्याचे सूत्रसंचालन निवेदक पैलवान युवराज केचे यांनी केले.