किल्ले ऐतिहासिक दागिना
By admin | Published: February 21, 2015 02:00 AM2015-02-21T02:00:12+5:302015-02-21T02:00:12+5:30
किल्ले हे महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. या वास्तू ऐतिहासिक दागिना असून त्यांचे जतन केले पाहिजे, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी केले.
पुणे : किल्ले हे महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. या वास्तू ऐतिहासिक दागिना असून त्यांचे जतन केले पाहिजे, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शुक्रवारी केले.
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने सिंहगडाच्या पायथ्याशी गप्पांगण येथे आयोजित पाचव्या दुर्ग साहित्य संमेलनात ते बोलत होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देव, प्रा. वीणा देव, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अरविंद जामखेडकर, स्वागताध्यक्ष जयप्रकाश सुराणा, गिर्यारोहक उमेश झिरपे आदी उपस्थित होते. संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा दुर्गसाहित्य पुरस्कार दुर्ग अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांना देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे होते.
पुरंदरे म्हणाले, ‘‘काही विद्यार्थ्यांनी सिंहगड किल्ल्याची साफसफाई केली; तेव्हा दोन हजार दारूच्या बाटल्या सापडल्या. आपण किल्ल्यांचे किती जतन करतो, त्यांची निगा राखतो, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. किल्ले आपल्याला इतिहास सांगतात. त्यांची माहिती सर्वसामान्य माणसाला व्हावी यासाठी हे संमेलन आहे. यातून आपल्याला एक समाज निर्माण करायचा आहे.’’
डी. एस. कुलकर्णी म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळी किल्ल्याचे व्यवस्थापन आकर्षक होते. सर्व सोयीसुविधा त्या वेळी केल्या होत्या. आता जर असे किल्ले बांधायचे म्हटले तरी तसे व्यवस्थापन आपल्याला जमणार नाही. हे वास्तुशास्त्र म्हणजे गडाचे आकर्षण आहे. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले महाराष्ट्रात उभे केले आहे. आपला इतिहास प्रत्येक मराठी माणसाला कळावा यासाठी हे साहित्य संमेलन आहे.’’
विजय देव म्हणाले, ‘‘दुर्गविषय साहित्य वाचले जावे आणि नवीन दुर्गविषय साहित्य कसे निर्माण होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन दुर्ग साहित्याचे जतन संवर्धन जनजागरण करण्याची आवश्कता आहे. यासाठीच संयुक्त महाराष्ट्राचा विकास आधुनिक अंगाने करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
४घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत, तेथील व्यवस्थेबाबत चर्चा होते. जेवण काय आहे, हादेखील चर्चेचा विषय होतो. परंतु, त्यापेक्षा साहित्य संमेलनांचा इतिहास काय आहे? घुमानमध्ये साहित्य संमेलन का होते आहे? त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, हे पाहणे गरजेचे आहे, असे मत बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
४भारताने इतर देशांमधून काही आदर्श घ्यायला हवा. ते त्यांच्या संस्कृतीवर प्रेम करतात तसे प्रेम भारतातले नागरिक करताना दिसत नाही. किल्ल्यांचा इतिहास काय आहे यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
४किल्ले आपल्याला इतिहास सांगतात त्यामुळे त्यांच्या संवधर्ननासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी दुर्ग साहित्य संमेलनाच्या माध्यमातून याला प्रोत्साहन मिळते.