चाळीस टक्के पदे कोतवालांना राखीव ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:50+5:302021-08-27T04:15:50+5:30
कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये कोतवाल संवर्गामधून शिपाई या पदामध्ये शासन निर्णयाप्रमाणे ...
कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये कोतवाल संवर्गामधून शिपाई या पदामध्ये शासन निर्णयाप्रमाणे पदोन्नती झालेली आहे व त्या कोतवालांना मासिक मानधन १५ हजार रुपये मिळत आहे. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये वेळोवेळी मागील दोन वर्षांपासून ॉपत्र व्यवहार केला असूनही पदोन्नती व सेवाज्येष्ठता याबाबत आजअखेर दखल घेण्यात आलेली नाही. सन २०१९ च्या महसूल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी
कोतवालांची पदोन्नती व सेवाज्येष्ठता यादी तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु या कामामध्ये दिरंगाई होत असून यासाठी महसूल व कूळकायदा शाखेशी संपर्क साधला असता तुमचे काम चालू आहे, असे उत्तर गेल्या तीन वर्षांपासून मिळत आहे. महसूल शाखा यांच्याशी संपर्क साधला असता आपले पदोन्नती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे (महसूल शाखा) व सहसचिव, महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट ड पदांचे (सेवा प्रवेश) नियम- २०१७ मध्ये सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव सादर केला असून, संघटनेस कळविण्यात आले आहे, असे उत्तर मिळाले.
यासंदर्भात पुणे जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे ३ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये चौकशी केली असता या पत्राचे आधारे जिल्ह्यामध्ये कोतवालमधूनसुध्दा पदोन्नती देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत असे सांगण्यात आले. कोल्हापूर, नाशिक, अमरावती, अहमदनगर, बुलडाणा या जिल्ह्यांत शासन निर्णयाप्रमाणे ४० टक्के गट ड शिपाई या पदामध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. परंतु पुणे जिल्हामध्ये आजपर्यंत पदोन्नती झालेली नाही. याचबरोबर जिल्ह्यामध्ये अनेक वयस्कर कोतवाल सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना निवृत्तीनंतरची रजा रोखीकरण बिले ही खूप उशिरा भेटतात. तसेच काही वेळेस भेटतसुध्दा नाहीत. तरी प्रत्येक तालुक्यातील सेवानिवृत्त झालेले कोतवालांना लवकर रजा रोखीकरण बिले देणेत यावीत, अशा सूचना लेखी स्वरूपात तहसीलदार यांना देण्यात याव्यात व गोरगरीब कोतवालांना न्याय द्यावा, अशी विनंती पुणे जिल्हा कोतवाल संघटनेमार्फत करण्यात आली आहे. या मागण्यांबाबत तत्काळ अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
---
फोटो क्रमांक : २६ लोणी काळभोर कोतवाल संघटना
फोटो ओळी : मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना पुणे जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेचे पदाधिकारी.