गुरगुरणे ऐकले आणि सापडले बिबट्याचे चार बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 20:56 IST2018-03-25T20:56:42+5:302018-03-25T20:56:42+5:30
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत.आता चार बछडे सापडल्यावर तरी वनविभाग जागा होणार का असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

गुरगुरणे ऐकले आणि सापडले बिबट्याचे चार बछडे
पुणे : तामखरवाडी (ता. शिरूर) येथे शनिवारी रामदास केरू खोमणे यांच्या शेतात ऊसतोडणी चालू असताना बिबट्याचे चार बछडे ऊसतोडणी कामगारांना आढळले.वनविभागाने हे बछडे एका कॅरटमध्ये ठेवले. रात्री ७.३० च्या सुमारास बछड्यांची आई कॅरटमधील सर्व बछड्यांना घेऊन गेली. हा सर्व प्रकार वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. यामुळे येथील नागरिक कायम दहशतीखाली असतात. शनिवारी रामदास केरू खोमणे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. या वेळी कामगारांना गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता बिबट्याचे चार बछडे त्यांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने मालकाला दिली. खोमणे यांनी ही माहिती वनविभागाला दिली. जुन्नर येथील वनविभागाचे अधिकारी, तसेच बिबट्या निवारा केंद्राचे अजय देशमुख घटनास्थळी आले. त्यांनी सर्व बछड्यांना एका कॅरटमध्ये ठेवत शेतात सोडून दिले. जवळपास ८ च्या सुमारास बिबट्याची मादी शेतात आली. तिने एक-एक करून सर्व बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. यामुळे येथील नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाहीत. यामुळे या ठिकाणी पिंजरा बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.