अबब ! उजनीत सापडला एकोणतीस किलोचा 'कटला' मासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 07:43 PM2019-06-22T19:43:28+5:302019-06-22T19:54:08+5:30
इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात मच्छिमारी करणाऱ्या परमेश्वर बनगे यांच्या जाळ्यात कटला मासा सापडला असून त्याचे वजन तब्बल २९ किलो असून, त्याला शनिवारी इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोनशे चाळीस रुपये प्रमाणे सात हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला असल्याने संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे.
पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात मच्छिमारी करणाऱ्या परमेश्वर बनगे यांच्या जाळ्यात कटला मासा सापडला असून त्याचे वजन तब्बल २९ किलो असून, त्याला शनिवारी इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोनशे चाळीस रुपये प्रमाणे सात हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला असल्याने संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे.
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव जवळील परमेश्वर बनगे यांनी उजनी जलाशयात मासेमारी साठी जाळे लावल्यानंतर त्यांना शुक्रवारी संध्याकाळी हा कटला मासा जाळ्यात सापडल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी बाजारात विक्रीसाठी घेवून आले होते. त्यावेळी एवढा मोठा मासा पाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
मासळी बाजारात दत्तात्रय व्यवहारे यांच्या तेजस फिश मार्केटच्या आडतीवर त्या माशाचा लिलाव करण्यात आला, हा मासा विकत घेण्यासाठी अनेक मासे व्यापाऱ्यांनी चढा ओढीने बोली लावल्याने लिलावामध्ये २४० रुपये प्रतिकिलो प्रमाणे २९ किलोच्या माशाला एकूण सात हजार रुपयांचा शनिवारचा सर्वात उच्चांकी दर मिळाला. हा मासा डिकसळचे मासे व्यापारी लक्ष्मण शिर्के यांनी विकत घेतला असून, तो मासा कलकत्त्याला निर्यात केला आहे. उजनी जलाशयात वेगवेगळ्या जातींचे ३० प्रकारचे मासे आढळतात, मात्र जलाशयात महाराष्ट्र राज्य मत्स्य विकास विभागाकडून मत्स्यबीज सोडण्यात हेळसांड झाल्याने व चिलापी माशाच्या आक्रमणामूळे पूर्वी जे कटला, मरळ, रहू, शिंगाडा, चांभारी, वांब हे मुबलक प्रमाणात मिळणारे मासे सध्या कमी प्रमाणात मिळत आहेत. सध्या उजनीतील पाणी कमी झाल्यामुळे नदीपत्रात तळाला असणारे मोठे मासे अगदी सहजपणे सापडत असल्याने अशा मोठ्या वजनाच्या माशांची आवक मासळी बाजारात वाढली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मासेमारीचा व्यवसाय उजनी धरणावर चालतो. या धरणात २० ते ३० प्रकारच्या जातीचे मासे सापडतात. या धरणातील मासे परदेशातही पाठविले जातात. या धरणात चिलापी व चांभारी जातीचे मासे मुबलक प्रमाणात मिळतात. इंदापूर मासळी बाजारात चिलापी जातीच्या माशाला मोठी मागणी आहे. असे मासे विक्रेत्यांनी सांगितले.