संशोधनाचा पायाच कच्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:58+5:302021-09-09T04:15:58+5:30

विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित होतात. त्यात तार्किक विचार, गणितीय क्षमता, प्रात्यक्षिकांमुळे कार्य संस्कृती आदींचा समावेश ...

The foundation of research is raw | संशोधनाचा पायाच कच्चा

संशोधनाचा पायाच कच्चा

Next

विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित होतात. त्यात तार्किक विचार, गणितीय क्षमता, प्रात्यक्षिकांमुळे कार्य संस्कृती आदींचा समावेश करता येईल. एखाद्या कंपनीमध्ये रोजगारासाठी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कंपनीकडून देण्यात आलेले कोणतेही काम करावे लागते. विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान असेल तर ते कोणत्याही ठिकाणी काम करू शकतात. त्यातही अनेक कंपन्यांमध्ये विज्ञानातील मूलभूत ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानापासून दूर जाणे योग्य नाही.

गेल्या काही वर्षांपासून इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत किती गुण मिळतात याला फारसे महत्त्व राहिले नाही. बारावीनंतरच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे नीट, जेईई, एमएचसीईटी आदी प्रवेशपूर्व परीक्षांच्या अभ्यासाकडेच विद्यार्थी अधिक लक्ष देतात. त्यामुळे केवळ ८५ ते ९५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्के गुण असणारे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. परिणामी सर्वसाधारणपणे ५५ ते ७५ टक्के गुण असणारे विद्यार्थीच बीएस्सी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचा कल तात्काळ रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येते. परिणामी संशोधन क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी हे मध्यम स्तरावरील असतात.

मूलभूत विज्ञानाच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. मात्र, एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच मर्यादित आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे यासाठीच आयसरसारख्या संस्थांची निर्मिती झाली. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांत या संस्थांमधून मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन झाले आहे. तथापि, नोबेल पारितोषिक मिळू शकेल या दर्जाचे काम होण्यासाठी बराच वाव आहे, ही वस्तुस्थिती आहे.

गेल्या काही वर्षांचा विचार करता प्रत्येक विद्यार्थी आता केवळ नोकरीचा विचार करीत असल्याचे दिसून येते. त्यातही आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी अधिक आहेत. मात्र, बीएस्सी, एमएस्सी, एमटेक, आयसरमधील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना किंवा विज्ञान शाखेत एखाद्या विषयात सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यालाही आयटीमधील नोकरीच्या दर्जाचे पॅकेज मिळत नाही. त्यामुळे एमएस्सी, बी.ई./एम.ई. (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इ.) अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीसुद्धा आयटी क्षेत्राकडे वळत आहेत. परिणामी मूलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष होत आहे.

विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले असून, अजूनही मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानाकडे वळावे यासाठी शासनाने ‘इन्स्पायर’, के.व्ही.पी.वायसारख्या अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र, या सर्व योजनांना ही मर्यादा आहे, असे दिसून येते. त्यामुळे फक्त शासनाच्या किंवा विद्यापीठाच्या पातळीवर अवलंबून न राहता उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था व महाविद्यालये यांनी आपल्या स्तरावर वेगवेगळ्या प्रोत्साहनपर योजना राबविण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी प्रात्यक्षिकांमधून अनेक बाबी शिकत असतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीव्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण पद्धती वापरून विद्यार्थ्यांना आपल्या विषयात आवड निर्माण होईल यादृष्टीने स्वत:हून वेगळे प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये गुंतवून ठेवणे, प्रकल्पांवर आधारित ट्रेनिंग आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत विज्ञानविषयक रस निर्माण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. पालकांनीही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे; परंतु शिक्षकांनी अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवावे की विद्यार्थ्यांना ‘बीएस्सी’ची निवड करा, असे सांगण्याची वेळच येऊ नये. संशोधन झाले नाही तर ‘इनोव्हेशन’ होणार नाही. इनोव्हेशन झाले नाही तर माणसाच्या गरजांना पूरक अशा वस्तू व सेवांची निर्मिती होऊ शकणार नाही. परिणामी नवीन उद्योग उभे राहू शकणार नाहीत. त्यामुळे संशोधन हे देशाच्या अर्थकारणाशी संबंधित असून, त्याचा पाया मूलभूत विज्ञानावर उभा आहे, हे विसरून चालणार नाही.

- डॉ. के. सी. मोहिते, माजी अधिष्ठाता, विज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ

Web Title: The foundation of research is raw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.