आई आयुष्याचा पाया...
By admin | Published: May 9, 2016 01:06 AM2016-05-09T01:06:11+5:302016-05-09T01:06:11+5:30
’आई’ हे एक असे नाते आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया असते. माणूस जसजसा आयुष्यात पुढे जातो, तसे ते नाते थोडे मागे पडल्यासारखे वाटते; पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई असतेच
पुणे : ’आई’ हे एक असे नाते आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया असते. माणूस जसजसा आयुष्यात पुढे जातो, तसे ते नाते थोडे मागे पडल्यासारखे वाटते; पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई असतेच, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त करीत ‘आई’चे महत्त्व विशद केले. निमित्त होते, जागतिक मातृत्व दिनानिमित्त लेखिका सुधा मेनन यांनी आयोजित केलेल्या ‘मेमरीज आॅफ ग्रोइंग अप विथ मॉम’ या कार्यक्रमाचे.
प्रख्यात बॉलरूम नर्तक व नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर व त्यांची आई राणी सोपारकर, एकांश ट्रस्टच्या संस्थापिका अनिता अय्यर व त्यांची कन्या, तसेच विविध क्षेत्रांतील अनेक यशस्वी महिला व त्यांची मुले या वेळी उपस्थित होते.
मातृत्वाविषयी आपले अनुभव मांडताना अनिता अय्यर म्हणाल्या, ‘आई म्हणून मुलांना वाढविताना, अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. आईचे मुलांवर प्रेम असतेच; पण मुलांची प्रत्येक कृती आईला आवडेलच, असे नाही. वेळ येईल, तेव्हा आईचे मत मांडणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे, मुलांनादेखील त्यांचे मत मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य हवे.’
कौटुंबिक रचनेतील स्त्रीच्या भूमिकेचाही मागोवा याप्रसंगी घेण्यात आला. स्त्री मुलाला जन्म देते, म्हणजे ते अपत्य सर्वस्वी तिचीच जबाबदारी आहे, हा विचार चुकीचा आहे, असे मत या वेळी मांडले गेले.
याविषयी बोलताना, बँकेच्या एम्प्लॉयी एंगेजमेंट विभागाच्या ग्लोबल हेड अनुजा काळे-अगरवाल म्हणाल्या, ‘माझे पती व मी आमच्या मुलाची जबाबदारी विभागून घेतो. यामुळे माझ्यावर अतिरिक्त भार पडत नाही. मला व माझ्या पतीला आपापली करिअर्स व्यवस्थित सांभाळता येतात.’ (प्रतिनिधी)