लाखेवाडी हल्ला प्रकरणी चार आरोपींना अटक
By admin | Published: June 30, 2015 12:10 AM2015-06-30T00:10:07+5:302015-06-30T00:10:07+5:30
लाखेवाडी येथील हल्ला प्रकरणातील ४ आरोपींना आज (दि. २९) इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ५ झाली आहे.
इंदापूर : लाखेवाडी येथील हल्ला प्रकरणातील ४ आरोपींना आज (दि. २९) इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ५ झाली आहे.
राजू ऊर्फ राजेंद्र बाळकृष्ण ऊर्फ कृष्णा शिंगाडे (वय ४०), विलास पांडुरंग खुरंगे (वय ५५), नामदेव दादा खुरंगे (वय ४०), कृष्णा शंकर शिंगाडे (वय ६५, सर्व रा. लाखेवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. कृष्णा शिंगाडे याला सोमवारी (दि. २९) दुपारी बाराच्या सुमारास, तर उर्वरित तिघांना चारच्या सुमारास तालुक्यातील शेळगाव येथून अटक करण्यात आली.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, इंदापूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार गलगले, महेश माने, संजय जाधव यांनी ही कामगिरी केली.
या प्रकरणातील संजय बाळकृष्ण शिंगाडे, महादेव पांडुरंग खुरंगे हे दोन प्रमुख आरोपी अद्यापही फरारी आहेत. पकडण्यात आलेला नामदेव दादा खुरंगे याचा प्रमुख आरोपींमध्ये समावेश नव्हता.
या पार्श्वभूमीवर, दलित संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनावर या संघटना ठाम आहेत. हे प्रकरण ज्या अधिकाऱ्यामुळे अधिक गुंतागुंतीचे झाले, ते सहायक पोलीस
निरीक्षक पी. व्ही. काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय, आरोपींवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील इतर कलमान्वये
गुन्हे दाखल झाल्याखेरीज
आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे. (वार्ताहर)
महामोर्चाचा इशारा
सर्व आरोपींनी त्वरित अटक करण्यात यावी; अन्यथा राज्यातील संघटना एकत्रित करून इंदापूर तहसील कचेरीवर महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रिपाइं-मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्ञानदेव खंडागळे यांनी दिला़ निषेध सभेत खंडागळे बोलत होते़