वाघोली येथे दोन सराईतांसह चौघे गजाआड, घरफोडीचे गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 03:15 PM2019-10-07T15:15:09+5:302019-10-07T15:50:30+5:30
पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पायगुडे वस्ती येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
लोणी काळभोर: पुणे शहर व ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांसह चौघांना रविवारी (दि़ ६) दुपारी वाघोली येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले आहे़. यातील अन्य दोघे हे चोरीचा ऐवज विकणार आहेत़. दरम्यान दोघांनी वाघोली येथील पायगुडे वस्तीत घरफोडी केल्याची कबूली दिली़.
राहूल यमनप्पा गायकवाड ( वय २१, रा.गारुड वस्ती, लोहगाव, पुणे ), भरत संजय स्वामी ( वय १९, रा. संतनगर ससाणे हाईटस, लोहगाव, पुणे ) अशी सराईतांची नावे आहेत़ तर विनोद गणेश सिंग ( वय ३४, रा.धानोरी गावठाण, पुणे ), उपेंद्र शिवपुजन राम ( वय२४, रा. अमनोरा पार्क लेबर कॅम्प रूम, हडपसर, पुणे )अशी चोरीचा ऐवज विक्री करणाऱ्यांची नावे आहेत़.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि़ १७ ऑगस्ट रोजी वाघोली येथील पायगुडे वस्तीत घरफोडी झाली होती़. यामध्ये १० हजार रोख व दोन मोबईल लंपास केले होते़ दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानेही परिसरात घडलेल्या घरफोड्यांचाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे़. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना घरफोडी करणारे राहुल व भरत हे दोघे रविवारी दुपारी वाघोली येथील आव्हाळवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती़. त्यानुसार पोलीस निरीक्षक गुंड व त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, विजय कांचन, जनार्दन शेळके, राजु मोमीन, धिरज जाधव, अक्षय नवले आदींनी परिसरात गस्त वाढवली़.
त्यानंतर आव्हाळवाडी फाटा येथे सापळा रचत राहुल व भरत या दोघांनाही ताब्यात घेतले़ त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पायगुडे वस्ती येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीचा ऐवज विनोंद सिंग व उपेंद्र राम यांच्या मदतीने विकल्याचेही त्यांनी प्राथमिक तपासात सांगितले़ त्यामुळे सिंग आणि राम यांनाही अटक करण्यात आली़.
राहुलवर आठ तर भरतवर चार गुन्हे
राहूल गायकवाड व भरत स्वामी हे दोघेही सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत़ यातील राहुलवर विमानतळ पोलीस ठाणे, पुणे शहर, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, बंंडगार्डन पोलीस ठाणे येथे आठ तर भरतवर पुुणे शहरातील येरवडा पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे, विमानतळ पोलीस ठाण्यात व लोणीकंद पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे ४ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून परिसरातील अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़.