रांजणगाव येथील गोळीबार प्रकरणी चार आरोपी गजाआड
By admin | Published: May 12, 2015 04:13 AM2015-05-12T04:13:20+5:302015-05-12T04:13:20+5:30
रांजणगाव एमआयडीसीमध्ये गोरक्ष नानासाहेब काळे यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार करून पसार झालेल्या चौघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे
पुणे : रांजणगाव एमआयडीसीमध्ये गोरक्ष नानासाहेब काळे यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार करून पसार झालेल्या चौघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ४ पिस्तुले व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दोन गटांतील वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रभारी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश पांडुरंग काळे, गणेश श्रीरंग महाजन, सतीश रावसाहेब रासकर, केतन हंसराज सल्ले अशी आरोपींची नावे असून, नगर व पुणे जिल्ह्यांत त्यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
निमोणे गावात पोलीस पथकाने केलेल्या चौकशीत शब्बीर शेख व गणेश काळे यांना ग्रामस्थांकडून जबर मारहाण झाल्याची माहिती पुढे आली. शेख याच्या मुलाने एका मुलीची छेड काढल्यावरून गोरक्ष काळे व या दोघांची भांडणे झाली. या वेळी दोन्ही गटांनी एकमेकांबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. एक आरोपी शब्बीर शेख याचा या प्रकारानंतर दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. त्या गुन्ह्यात आठ जणांना अटक झाली आहे. (प्रतिनिधी)