विश्रांतवाडीतील तरुणाच्या खूनाप्रकरणी चार आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 09:09 PM2022-07-07T21:09:43+5:302022-07-07T21:11:46+5:30
पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली..
येरवडा: विश्रांतवाडी येथे बुधवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला होता. तुषार जयवंत भोसले (वय २३, रा. दांडेकर पूल, दत्तवाडी) याचा खून केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी बाळू अर्जुन शिंदे (वय ४२), फ्रांसिस स्वामी उर्फ भैय्या अँथनी स्वामी (वय २०, दोघेही रा. सन. ११२, विश्रांतवाडी), सरफराज सलीम शेख उर्फ गोल्या (वय २०, रा. विठ्ठल मंदिर मागे धानोरी), अकबर शहाबुद्दीन शेख(वय २२, रा. भिमनगर, विश्रांतवाडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार याचे फ्रान्सेस स्वामी उर्फ भैय्या याच्यासोबत पूर्वी काही कारणावरून वाद झाले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुषार वडारवस्ती येथे आला होता. याठिकाणी तुषार व भैय्या यांच्यात पुन्हा शिवीगाळ वादावादी झाली. त्यानंतर तुषार याने त्याच्या पत्राचाळ विश्रांतवाडी व जनता वसाहत दत्तवाडी येथील साथीदारांना विश्रांतवाडी येथील वडार वस्तीत बोलावून घेतले. येथे आल्यानंतर ते भैय्या याचा वस्तीत शोध घेऊ लागले. भैय्या याचा मित्र बाळू शिंदे यांच्या घरात गेल्यानंतर बाळूने तुषार याला हातातील चाकुने पोटात व छातीत वार केले. तर त्याचे इतर साथीदार भैय्या, सरफराज व अकबर यांनी लाकडी बांबू रोड व सत्तुर घेऊन पाठलाग करत मारहाण व दगडफेक करण्यास सुरुवात केली.
बाळू याने तुषार याच्यावर चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी झाला. तुषार याचा भाऊ आदित्य व त्याच्या इतर साथीदारांनी त्याला आधी खासगी रुग्णालयात व नंतर ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणी पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तुषार भोसले याच्या खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौघा आरोपींना तात्काळ अटक केली आहे
अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते, हवालदार दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, पोलीस नाईक संपत भोसले, संजय बादरे, पोलीस शिपाई संदीप देवकाते, प्रफ्फुल मोरे, शेखर खराडे यांच्या पथकाने खुनातील आरोपींना तात्काळ अटक केली.