साडेचार एकर उसाला आग
By admin | Published: November 11, 2015 01:35 AM2015-11-11T01:35:19+5:302015-11-11T01:35:19+5:30
राजेगाव (ता. दौंड) परिसरातील मेंगावडेवस्ती येथील तोडणीसाठी आलेल्या आडसाली उसाला मेनलाईनच्या वीजवाहक करणाऱ्या तारांना शॉर्टसर्किट झाल्याने साडेचार
राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) परिसरातील मेंगावडेवस्ती येथील तोडणीसाठी आलेल्या आडसाली उसाला मेनलाईनच्या वीजवाहक करणाऱ्या तारांना शॉर्टसर्किट झाल्याने साडेचार एकर ऊस जळून खाक झाला. गट नंबर ३६ मधील सर्जेराव मेंगावडे यांच्या मालकीचा दीड एकर, जगन्नाथ मेंगावडे यांच्या मालकीचा अर्धा एकर, गट नंबर ४३५ मधील शामराव ढमे यांच्या मालकीचा ३0 गुंठे, आत्माराम ढमे यांच्या मालकीचा ३0 गुंठे आणि श्रीकांत राऊत यांच्या मालकीचा एक एकर असा एकूण साडेचार एकर ऊस जळून खाक झाला आहे.
ऊसजळीत झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार राजेगाव परिसरातील मेंगावडेवस्ती येथील जगन्नाथ मेंगावडे यांच्या शेतातून मेनलाईटच्या वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. तेथे २२ केव्हीच्या खानवटे फिडरचा कटपॉईंट आहे. या कटपॉईंट असणाऱ्या विजेच्या मेनलाईटच्या खांबावर वीज आल्यानंतर शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडतात, अशी तोंडी तक्रार वारंवार वीज महामंडळाकडे संबंधित शेतकऱ्यांनी केलेली होती. तोंडी तक्रारीनंतर दोन - तीन वेळा वायरमन येऊन तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून गेलेले होते. त्यामुळे सदरचे नुकसान वीजवाहक करणाऱ्या तारा शॉर्टसर्किट होऊनच झाल्याचे ठाम मत येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
जळीत घटनेनंतर महसूल विभागाच्या वतीने तातडीने पंचनामा केला आहे. सदर जळीत झालेला सर्वच ऊस आडसाली ऊस असून तोडणीसाठी योग्य झालेला ऊस होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे मत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले. वीज मंडळाच्या वतीने देऊळगावराजे महावितरणच्या शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता विशाल सोनवणे, वायरमन अंकुश ढमे, गुणवरे व पोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.