पार्ट टाइम काम देते म्हणत साडेचार लाखांना गंडवले; गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Published: January 25, 2024 06:16 PM2024-01-25T18:16:07+5:302024-01-25T18:16:39+5:30
पुणे : पार्ट टाइम काम देण्याच्या नावाखाली महिलेने साडेचार लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर कोंढवा ...
पुणे : पार्ट टाइम काम देण्याच्या नावाखाली महिलेने साडेचार लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर कोंढवा पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हडपसर परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. मालन गणेश त्रिबके असे फिर्यादीचे नाव आहे. हा प्रकार १२ डिसेंबर २०२३ ते १९ डिसेंबर २०२३ दरम्यान घडला. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून तक्रारदार फिर्यादींच्या व्हॉट्सॲपवर मेसेज आला. रुही असे माझे नाव असून, ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असा तो मेसेज होता. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात मोबदला मिळेल, असे मेसेजमध्ये म्हटले होते तसेच संबंधित कामाचे आणि पैसे कमावल्याचे स्क्रीनशॉटही पाठविले.
त्यानंतर फिर्यादींना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून वेगवेगळे टास्क दिले. सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा चांगला मोबदला दिला आणि विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे सांगितले. एकूण ४ लाख ४८ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने हडपसर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवले करीत आहेत.