सहा महिन्यांत भरोसा सेलकडे ज्येष्ठांच्या साडेचारशे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:52+5:302021-06-16T04:12:52+5:30

पुणे : आधुनिक काळात ज्येष्ठांचे कुटुंबातील स्थान समस्यांनी घेरले जाऊ लागले आहे. ज्येष्ठांकडे ‘आधार’ म्हणून न पाहता ‘अडचण’ म्हणून ...

Four and a half hundred complaints of seniors to the trust cell in six months | सहा महिन्यांत भरोसा सेलकडे ज्येष्ठांच्या साडेचारशे तक्रारी

सहा महिन्यांत भरोसा सेलकडे ज्येष्ठांच्या साडेचारशे तक्रारी

Next

पुणे : आधुनिक काळात ज्येष्ठांचे कुटुंबातील स्थान समस्यांनी घेरले जाऊ लागले आहे. ज्येष्ठांकडे ‘आधार’ म्हणून न पाहता ‘अडचण’ म्हणून पाहण्याची प्रवृत्ती बळावली आहे. त्यामुळेच ज्येष्ठांची शारीरिक, मानसिक, आर्थिक पिळवणूक वाढली आहे. ज्येष्ठांसाठी मदतीचा हात देणाऱ्या पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे गेल्या सहा महिन्यांत ४५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २८२ तक्रारी मानसिक आणि शारीरिक फसवणुकीच्या आहेत.

१५ जून हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविषयक जागृती दिन’ म्हणून पाळला जातो. ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारांना वाचा फुटावी आणि त्यांना आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जगता यावा, हा या दिवसामागील उद्देश आहे. ‘जनरेशन गॅप’मुळे दोन पिढ्यांमधील संघर्ष वाढीस लागला आहे. बदलती जीवनशैली, महागाई, छोटी घरे, मालमत्ता हक्क अशा अनेक कारणांमुळे तरुण पिढी आणि ज्येष्ठांमध्ये वाद होतात. त्यातूनच ज्येष्ठांची मानसिक, शारीरिक, आर्थिक, मालमत्तेशी संबंधित छळवणूक आणि अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. आपण निरुपयोगी असल्याची भावना निर्माण झाल्याने ज्येष्ठ अधिकच एकटेपणाच्या खाईत ढकलले जातात.

बरेच ज्येष्ठ नागरिक एकटे घरात राहत आहेत. एकटेपणामुळे अनेकदा त्यांच्या मनात वैफल्य वा आपल्याला मदत करणारे कोणीही नसल्याची भावना असते. कोरोनाच्या काळात त्यांच्याबाबतीत तर ही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. अशा वेळी ‘भरोसा सेल’मार्फत ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तू आणण्यास मदत करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न असे उपक्रम हाती घेतले जात आहेत.

भरोसा सेलकडे शहरातील १९,०५० ज्येष्ठ नागरिक नोंदणीकृत आहेत, तर ६५० नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भरोसा सेलची टीम कार्यरत आहे. सेलकडे जानेवारी ते मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये सर्वाधिक तक्रार अर्ज आले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत मानसिक आणि शारीरिक फसवणुकीच्या १४१, मालमत्तेशी संबंधित २९, आर्थिक ३६ तर इतर ३६ तक्रारींचा समावेश आहे. एकूण २२३ तक्रारींपैकी १६५ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ५८ अर्ज प्रलंबित आहेत.

-----

महिना-अर्ज-शारीरिक, मालमत्ता आर्थिक इतर

मानसिक

जानेवारी-६५-३४-११-८-१२

फेब्रुवारी-५३-३५-९-४-५

मार्च-६२-४२-२-४-१४

एप्रिल-३१-२१-६-०-४

मे-१२-९-१-१-१

------

बरेचदा वृद्धांना कुटुंबातील किंवा बाहेरील व्यक्तींकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो. वयोवृद्ध लोक एकटे असतील तर इतर लोक आर्थिक फसवणूक करतात. बरेचदा मालमत्तेची संबंधित वादामुळेही ज्येष्ठांना त्रास दिला जातो. अशा परिस्थितीत भरोसा सेलच्या माध्यमातून ज्येष्ठांना मदतीचा हात दिला जातो. त्यासाठी १०९० ही हेल्पलाइन २४ तास आणि सातही दिवस कार्यरत आहे. लॉकडाऊनमध्ये किराणा माल देणे, औषधे आणून देणे अशा पद्धतीची मदत ज्येष्ठांना करण्यात आली. दररोज सरासरी वीस लोकांना फोन करून भरोसा सेलबद्दलची माहिती दिली जाते. ज्येष्ठांना एकटेपणा जाणवू नये यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो.

- राजेंद्र कदम, प्रमुख, भरोसा सेल

Web Title: Four and a half hundred complaints of seniors to the trust cell in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.