ब्रिगेडियर नाईक आत्महत्या प्रकरणी लष्करातील चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:25+5:302021-04-24T04:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधील (एएफएमसी) ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी आत्महत्या केल्याने पुण्यात खळबळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधील
(एएफएमसी) ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी आत्महत्या केल्याने पुण्यात खळबळ उडाली होती. त्यांना त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लष्करातलीच चौघांची नावे समोर आली असून, त्यांच्यावर पुणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ब्रिगेडियर ए. के. श्रीवास्तव, मेजर बलप्रीत कौर, मेजर नीलेश पटेल आणि लेफ्टनंट कर्नल कुशाग्रा अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
नाईक हे रविवारी सकाळी सरकारी गाडी घेऊन चालक बोडके याच्याबरोबर पुणे रेल्वे स्थानक परिसरात आले होते. यावेळी त्यांनी चालकाला एमसीओ मधून जाऊन येतो, असे सांगितले व त्यांना गाडीत थांबा असे म्हटले. त्यानंतर त्यांनी उद्यान एक्सप्रेस गाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या केली. फलाट क्रमांक 3 वर ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती. मात्र नाईक यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याने ही गोष्ट उघडकीस आली आहे. याबाबत नाईक यांचा मुलगा अभिषेक नाईक यांनी तक्रार दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत होते. यावेळी लोहमार्ग पोलिसांना नाईक यांच्या घरी चिठ्ठी मिळून आली. त्यात त्यांनी वरील चौघांनी त्रास दिल्याचे म्हटले आहे. तसेच, माझी विनाकारण चौकशी लावली. तसेच, प्रतिष्ठा खराब केली. कौर यांनी आपल्यावर आरोप केले असेही त्यांनी लिहिले आहे. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
.....