पेशंट व्हेंटिलेटरवर कसा गेला म्हणत डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:07 PM2021-03-31T15:07:23+5:302021-03-31T15:11:21+5:30
तीव्र मधुमेहाच्या बरोबरच ताप आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पेशंटची तब्येत गंभीर बनली होती.
पुणे : तीव्र मधुमेहाच्या बरोबरच ताप आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पेशंटची तब्येत गंभीर बनली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तुमच्यामुळे पेशंट व्हेंटिलेटरवर गेला, असे म्हणून डॉक्टरांना मारहाण करणार्या चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
असिफ कादीर शेख (वय ३३, रा. नयन अपार्टमेंट, अशोका म्युज, कोंढवा), जैद जुनेद घोडके (वय २०, रा. मिठानगर, कोंढवा), अफाक अफताब फराश (वय २२, रा. मिठानगर, कोंढवा) आणि अंजिक्य दत्तात्रय भांगे (वय २८, रा. नयन अपार्टमेंट, अशोका म्युज, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना इनामदार हॉस्पिटलमधील कोविड १९ सेंटरच्या जवळ २५ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी डॉ. सुहेल खान (वय ३७, रा. कोंढवा) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
डॉ. सुहेल खान यांचे कोंढव्यात सना हॉस्पिटल आहे. त्यांचा एक नेहमीचा ३८ वर्षाचा रुगण आजारी असल्याने १३ मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये आला होता. तो गोळ्या घेऊन गेला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. पण त्याने तो मानला नाही. दुसर्या दिवशी तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. तेव्हा त्याला खूप ताप आला होता. तसेच शुगरही वाढली होती. त्यामुळे त्यांनी त्याला दाखल करुन घेतले. नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. २१ मार्च रोजी त्याला इनामदार हॉस्पिटलमध्ये बेड मिळाल्याने तेथे हलविण्यात आले. रुग्णाची काहीही माहिती मिळत नाही. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे, इतकीच माहिती हॉस्पिटलकडून दिली जाते, असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना इनामदार हॉस्पिटलमध्ये येण्याची विनंती केली. त्यानुसार २५ मार्चला रात्री साडेदहा वाजता डॉक्टर खान नातेवाईकांबरोबर इनामदार हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी रुग्णाची भेट घेऊन डॉक्टरांकडून प्रकृतीची माहिती घेतली. त्याची फाईल पाहिली. त्यानुसार त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. खाली येऊन त्यांनी ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना सांगितली. त्याचवेळी असिफ शेख व त्याचे तीन मित्र तेथे आले. तुमच्यामुळे आमचा पेशंट व्हेंटिलेटरवर गेला असे सांगून त्यांनी डॉक्टरांच्या मामाला मारहाण केली. डॉक्टर खान यांनाही हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
वानवडी पोलिसांनी असिफ शेख सह त्याच्या मित्रांना अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.