500 रुपयांची वर्गणी न दिल्याने मोटारसायकल जाळणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 09:39 AM2018-09-02T09:39:18+5:302018-09-02T09:39:25+5:30

पाचशे रुपये वर्गणी न दिल्याने आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाची मोटारसायकल पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

four arrested for burning motorcycle in pune | 500 रुपयांची वर्गणी न दिल्याने मोटारसायकल जाळणाऱ्या चौघांना अटक

500 रुपयांची वर्गणी न दिल्याने मोटारसायकल जाळणाऱ्या चौघांना अटक

पुणे : पाचशे रुपये वर्गणी न दिल्याने आंबेगाव खुर्द येथे एका तरुणाची मोटारसायकल पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी (2 सप्टेंबर) पहाटे चार जणांना अटक केली आहे. दत्ता विजय शिंदे, ओमकार संदीप कांबळे, दत्ता राहुल कदम आणि सुमित राजू अहिवळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. 

याप्रकरणी प्रफुल चंद्रकांत थोरात (वय २० वर्ष) यानं फिर्याद दिली होती. प्रफुलचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. या चौघांनी त्यांच्याकडे दहीहंडीची पाचशे रुपये वर्गणी मागितली होती. पण, इतकी वर्गणी देणे आपल्याला शक्य नसल्याचे सांगितले. थोरातनं इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये आपली मोटारसायकल पार्क केली होती.  मागितलेली वर्गणी न दिल्याने रागावून त्या चौघांनी १ सप्टेंबरच्या मध्यरात्री  इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये थोरात यांनी लावलेल्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढले व ते मोटासायकलवर टाकून ती पेटवून दिली. या आगीत मोटारसायकलबरोबरच इमारतींचा पार्किंग स्लॅबलाही आग लागली होती.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, सहायक पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक खानविलकर, सहायक फौजदार शिंदे, फडतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने या चौघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आज पहाटे चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
 
वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास कारवाई
नागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहात साजरे करावे. मात्र, ते करताना कोणीही वर्गणीसाठी नागरिकांवर जबरदस्ती करु नये. जर असे कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे.
हडपसर येथे वर्गणी मागण्यावरुन नुकताच गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी हा इशारा दिला आहे.  असे असतानाही शहरात वर्गणीसाठी जबरदस्ती केल्याच्या घटना घडत आहेत.

Web Title: four arrested for burning motorcycle in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.