महेंद्र मल्लाव खून प्रकरणी चौघांना अटक
By Admin | Published: August 30, 2016 01:53 AM2016-08-30T01:53:42+5:302016-08-30T01:53:42+5:30
नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण (पुणे) विभागाच्या पथकाने मध्यरात्री चौघांना अटक केली
शिरूर : नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण (पुणे) विभागाच्या पथकाने मध्यरात्री चौघांना अटक केली. यातील मुख्य सूत्रधारांना अद्याप अटक केली नसल्याचे, तसेच त्यांच्या अटकेसाठी शोधपथके तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रवीण प्रकाश काळे (वय २३, रा. प्रोफेसर्स कॉलनी, जुना नाका नं. ३, शिरूर), विशाल सुनील काळे (वय २१, ढोरआळी, मुंबईबाजार, शिरूर), सनी संजय यादव (वय १९, रा. कामाठीपुरा, शिरूर) व रूपेश हेमंत लुणीया (वय १९, सोनारआळी, शिरूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
फिर्यादीत नमूद केलेल्या नानू कुर्लप व गणेश कुर्लप यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. रविवारी (दि. २८) भरदुपारी येथील रामआळीत मल्लाव यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी मल्लाव यांचे बंधू गणेश मल्लाव यांनी फिर्याद दाखल केली होती. हत्येनंतर मल्लावसमर्थकांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली. जमावाने जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तसेच पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना हवाली करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती.
दरम्यान, संध्याकाळी पाचच्यादरम्यान आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अॅड. अशोक पवार, सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी जमावाला शांत करण्यात यश मिळविले. जमाव शांततेत घरी परतला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. फिर्यादीत संशय व्यक्त केलेल्या चौघांना पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले. कुर्लपबंधूंच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. या चौघांना उद्या न्यायालयात जर केले जाणार आहे. (वार्ताहर)