रवी तावरे गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:54+5:302021-06-02T04:09:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती/सांगवी : माळेगाव (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे रविराज तावरे गोळीबार प्रकरणाचा अवघ्या पाच तासांत छडा लावला ...

Four arrested in Ravi Taware shooting case | रवी तावरे गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह चौघांना अटक

रवी तावरे गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह चौघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती/सांगवी : माळेगाव (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे रविराज तावरे गोळीबार प्रकरणाचा अवघ्या पाच तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या अल्पवयीन मुलासह चौघांना अटक केली आहे. राजकीय वैमनस्यातून रविराज तावरेंवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.

प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे, राहुल उर्फ रिबल यादव, व एक अल्पवयीन मुलाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: तावरे हे सोमवारी (दि. ३१) सायंकाळी त्यांच्या पत्नीसमवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. वडापाव घेऊन परत गाडीकडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरोंनी त्यांच्यावर गोळीबार करत फरार झाले. यात रवी तावरे यांच्या छातीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

घटनेनंतर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांची पथके बनविण्यात आली होती. खबऱ्यामार्फत मिळालेल्या बातमीनुसार आरोपींनी बुलेटवरून येत तावरे यांच्यावर गोळीबार केला. यानंतर ते हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे असल्याचे कळाले. पोलीस निरीक्षक ढवाण व गुन्हेशोध पथकाने त्यांना मध्यरात्री अटक केली. त्यांना बारामती तालुका पोलीस ठाण्यात आणले. अवघ्या ५ तासांत बारामती तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

चाेकट

प्रशांत मोरे हल्ल्याचा मास्टरमाइंड

बारामती तालुका पोलिसांसह गुन्हे शोध पथकाकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रशांत मोरे हा तावरे यांच्यावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याला मुंबई येथून गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार करण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

चौकट

राजकीय द्वेषातूनच हल्ला

जिल्हा परिषद सदस्या तावरे यांच्या गटात त्यांचे पती रविराज तावरे सामाजिक कार्य करत असतात. या कामांचा प्रशांत मोरे यांना द्वेष,दुजाभाव असल्याने त्या रागातून मोरे आणि रविराज तावरे यांच्यासमवेत वारंवार वाद होत असत. यामध्ये तावरे यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न या पूर्वी झाला आहे. या द्वेषातून कट रचून रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करीत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपासात आणखी बाबी पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सोमवारी रात्री पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पथकांची निर्मिती करीत तातडीने तपास सुरू केला. त्यामुळे आरोपींचा वेळेत शोध घेणे शक्य झाले.

चौकट

तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

रविराज तावरे यांच्यावर येथील गिरिराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पुण्यातील डॉक्टरांच्या पथकाने काल मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास शस्त्रक्रिया करीत तावरे यांच्या शरीरात घुसलेली गोेळी बाहेर काढली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे तावरे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

———————————————

फोटो ओळी : गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक करताना पोलीस निरीक्षक महेश ढवाण व इतर.

Web Title: Four arrested in Ravi Taware shooting case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.