मध्यस्थी करणाऱ्यावर चौघांचा कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:55+5:302021-09-07T04:12:55+5:30
पुणे : मित्रांची भांडणे मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगारासह चौघांनी तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...
पुणे : मित्रांची भांडणे मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगारासह चौघांनी तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अविनाश ऊर्फ पप्पू चंद्रकांत चौधरी (वय ३६), विशाल ऊर्फ पिंटू चौधरी (वय ३८), आकाश यादव (वय २५, तिघेही रा. गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेखर चिकने (रा. गाडीखाना, शुक्रवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अविनाश चौधरी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
याप्रकरणी गौरव रोहिदास काची (वय ३७, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. काची आणि आरोपी हे मित्र असून एकाच ठिकाणी राहतात. फिर्यादी यांचा मित्र दुर्गेश व आरोपी यांच्यामध्ये भांडणे झाली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी फिर्यादी गेले होते. त्याच्या रागातून अविनाश चौधरी याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. विशाल चौधरी याने लाकडी बांबूने पाठीत मारले. आकाश यादव याने लाकडी स्टंपने मारहाण केली. अविनाश चौधरी याने कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.