पुणे पोलीस दलाला महासंचालकांचे चार पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:46 PM2019-01-23T14:46:28+5:302019-01-23T15:17:35+5:30
पोलीस महासंचालकांकडून दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये जानेवारी ते मे २०१८ या कालावधीसाठी पुणे पोलीस दलाला चार पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे़.
पुणे : पोलीस महासंचालकांकडून दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये जानेवारी ते मे २०१८ या कालावधीसाठी पुणे पोलीस दलाला चार पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे़. गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न, सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत आणि सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी या गटात हे पुरस्कार जाहीर झाले आहेत़.
मुंढवा पोलिसांनी खाचखुचली टाकून लोकांची नजर चुकवून त्यांची बॅग पळवून नेणारी १९ जणांची टोळी जेरबंद केली होती़. त्यांच्याकडून पुणे, मुंबई, कल्याण, औरंगाबाद येथील २४ गुन्हे उघडकीस आले होते़. मार्च २०१८ मधील या कामगिरीबाबत गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न या गटात निवड करण्यात आली़. सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर (५ हजार रुपये), उपनिरीक्षक ए़ जी़ गवळी (३ हजार रु़), हवालदार सुरेश सोनवणे (२ हजार रु़) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे़ .
वारजे माळवाडी पोलिसांनी घरफोडीचे १२ गुन्हे उघडकीस आणून २१ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली होती़. तत्कालीन पोलीस निरीक्षक बी़ एऩ मोळे(५ हजार रु़), सहायक निरीक्षक बी़ एस़ शिंदे(५हजार रु़), पोलीस नाईक ए़ एम़ भोसले (३ हजार रु़) आणि एस़ बी़ पाटील (२ हजार रु़) यांची सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली़ .
रविवार पेठेतील सराफी दुकानात भरदुपारी शिरुन लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या नेपाळी टोळीला २४ तासाच्या आत गुन्हे शाखेने वापी येथे अटक केली होती़ . त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व माल हस्तगत केला होता़. या कामगिरीबद्दल सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम (५ हजार रु़), सहायक निरीक्षक धनंजय कापरे (३ हजार रु़), उपनिरीक्षक दिनेश पाटील ( २ हजार रु़) यांची सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कारासाठी निवड केली आहे़ .मार्केटयार्ड येथील पेटोल पंपावरील कॅश भरणा करण्यासाठी जात असताना लुटण्यात आले होते़. या गुन्ह्यातील ३२ लाख रुपये गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने हस्तगत केले होते़. त्यांची मे २०१८ साठी सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कारासाठी पोलीस निरीक्षक सिताराम मोरे ( ५हजार रु़), सहायक निरीक्षक रवींद्र बाबर (३ हजार रु़), पोलीस नाईक संदीप राठोड आणि अतुल साठे (प्रत्येकी १ हजार रु) यांची निवड केली गेली आहे़ .
घरी येणाऱ्या मित्राबरोबर राहताना अपंग मुलाची अडचण होत असल्याने आईने मित्राच्या मदतीने अपंग मुलाचा खुन केला होता़. या २०१६ मध्ये झालेल्या गुन्ह्यात आईला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती़. या कामगिरीबद्दल विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड (१० हजार रु़), पोलीस निरीक्षक संगीता पाटील (७ हजार रु़), उपनिरीक्षक मच्छिंद्र गोरडे ( ४ हजार रु़) आणि हवालदार कल्याण जगताप ( ४ हजार रु़) यांची सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे़.