दोन महिन्यांची चार बछडी सापडली

By admin | Published: May 4, 2015 02:50 AM2015-05-04T02:50:07+5:302015-05-04T02:50:07+5:30

शिवरातील डेरे मळ्यातील एका शेतात २ महिन्यांची बिबट्याची ४ बछडी सापडली आहेत. उसाचे पाचट पेटवून दिल्याने बछड्यांपैकी २ बछडी गंभीररित्या जखमी झाली आहेत.

Four calves of two months were found | दोन महिन्यांची चार बछडी सापडली

दोन महिन्यांची चार बछडी सापडली

Next

नारायणगाव : शिवरातील डेरे मळ्यातील एका शेतात २ महिन्यांची बिबट्याची ४ बछडी सापडली आहेत. उसाचे पाचट पेटवून दिल्याने बछड्यांपैकी २ बछडी गंभीररित्या जखमी झाली आहेत. जखमी बछड्यांना माणिक डोह येथील बिबट्या निवारण केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे, अशी माहिती नारायणगाव वन विभागाचे वन क्षेत्रपाल एस. एन. बनसोडे व डॉ. अजित देशमुख यांनी दिली.
शेतकरी एकनाथ बाबुराव तांबे यांच्या सर्वे क्रमांक ७८ मध्ये रविवार (दि.३) रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे बछडे आढळून आले. कामगार ऊस तोडण्यासाठी तांबे यांच्याकडे आले होते. त्यांनी ऊस तोडणीसाठी काही ठिकाणी असलेले उसाचे पाचट पेटवून दिले. त्यावेळी उसात एक मादी बिबट्या व तिचे ४ बछडे होते.
आग लागल्याने बिबट्या मादीने तेथे असलेले कामगार भाऊसाहेब केदार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र आग वाढल्याने केदार हे बचावले गेले आणि आगीच्या भितीने बिबट्या मादी ४ बछड्याना सोडून पळून गेली. आगीच्या लोळामुळे २ बछडे गंभीररित्या जखमी झाले, तर अन्य २ बछडे किरकोळ जखमी झाले.
बिबट्याची बछडी असल्याची माहिती तेथील कामगार भाऊसाहेब केदार, एकनाथ तांबे, अ‍ॅड. शिवदास तांबे यांना मिळाली. त्यांनी या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी नेले आणि वन विभागाला या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी नारायणगावचे वनक्षेत्रपाल एस. एन. बनसोडे, एम. जे. काळे, माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित देशमुख, डॉ. महेश ढोरे, एल. बी. शेलार यांनी घटनास्थळी येऊन या ४ बछड्यांना ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात नेले.
दरम्यान, नारायणगाव परिसरात सुमारे एक वर्षापासून २ बिबट्यांचा संचार आहे. याची माहिती ग्रामस्थांनी वेळोवेळी वन विभागाला दिलेली आहे. या २ बिबट्यांची या परिसरात दहशत असून त्यांनी परिसरातील सर्व पाळीव कुत्री व इतर जनावरे फस्त केली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात सुमारे २० ते ३० मोर असल्याने या ठिकाणी काही शिकारी रात्रीच्या वेळी येऊन त्यांची शिकार करतात. त्याकडे देखील वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, असे अ‍ॅड. शिवदास तांबे व एकनाथ तांबे यांनी सांगितले.

Web Title: Four calves of two months were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.