घटस्फोटाच्या दाव्यातील चार प्रकरणे एकाच वेळी निकाली : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 08:40 PM2018-08-17T20:40:29+5:302018-08-17T20:42:37+5:30
घटस्फोटाच्या दाव्यातील चारही प्रकरणांची एकाच वेळी सुनावणी होवून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दावे निकाली काढण्यात आले.
पुणे : पतीपासून घटस्फोट मिळावा, हुंडा मागत असल्याबाबत पत्नीने दाखल केलेली तक्रार, ही तक्रार रद्द करण्यासाठी पतीने दाखल केलेला दावा आणि घटस्फोटाचा खटला ओरिसाला चालविण्याची केलेली मागणी, अशा चारही प्रकरणांची एकाच वेळी सुनावणी होवून शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दावे निकाली काढण्यात आले.
सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश कुरीअन जोसेफ आणि न्यायाधीश संजय कौल यांनी ही प्रकरणे निकाली काढली. चारही खटले एकाच प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. प्रतिभा आणि अभिषेक (नावे बदललेली) असे दावा दाखल केलेल्या दाम्पत्याचे नाव. प्रतिभा व अभिषेकचे २०१२ साली लग्न झाले होते. दोघेही मूळचे ओरिसाचे. मात्र कामानिमित्त ते मुंबईला राहत. दोघेही आयटी कंपनीत कामाला आहेत. लग्न झाल्यानंतर काही महिन्यांत त्यांच्यात वाद सुरू झाले होते. त्यामुळे २०१६ पासून ते विभक्त राहत. अभिषेक आपल्याकडे पैशाची मागणी करतो, अशी तक्रार प्रतिभा हिने आरोसीतील नाबआनापूर येथे दाखल केली. हा दावा रद्द करावा म्हणून अभिषेकने ओरिसा येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
२०१७ साली प्रतिभाची पुण्याला बदली झाली. त्यावेळी त्यांचा वाद अगदी टोकाला गेल्याने प्रतिभाने पुण्यातील न्यायालयात अॅड. आम्रपाली कांबळे-कसबे यांच्यामार्फत घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. मात्र खटल्यासाठी पुण्याला जाणे शक्य नसल्याने हे प्रकरण ओरिसा येथे चालविण्यात यावे, यासाठी अभिषेकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पुण्यात कामाला आल्याने घटस्फोटाच्या दाव्यासाठी ओरिसाला जाणे शक्य नाही, अशी भूमिका प्रतिभाने घेतली होती. अभिषेक सर्वोच्च न्यायालयात गेल्याने सुनावणीपूर्वी न्यायालयाने दोघांना समुपदेशनासाठी पाठवले. त्यानुसार सुमपदेशक अॅड. व्ही. के. बिजू यांनी त्याचे सुमपदेशन केले. त्यावेळी दोघेही सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी तयार झाले. त्यानंतर दोघांनी काही अटी मान्य केल्या. अटींची पूर्तता झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मान्य केला. त्यामुळे खटला दुसरीकडे पाठविण्याचा अर्ज, पत्नीने दाखल केलेली हुंड्याबाबतची तक्रार आणि ही तक्रार रद्द करण्यासाठी पतीने केलेला दावा, अशी सर्व प्रकरणे एकाच वेळी सर्वोच्च न्यायालयात निकाली लागली. सर्वोच्च न्यायालयातील अॅड. दीपलक्ष्मी मतवाणकर यांनी देखील या प्रकरणाचे कामकाज पाहिले.