खवले मांजराची विक्री करणाऱ्या चौघांना रंगेहाथ पकडले-पुणे वन विभागाची कामगिरी : पाच दिवस न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:14+5:302021-02-15T04:12:14+5:30
या प्रकरणी महेंद्र मच्छिंद्र केदार (वय ३५, रा. साकुर, ता. संगमनेर), सागर भीमाजी डोके, (वय २५, रा. साकुर ), ...
या प्रकरणी महेंद्र मच्छिंद्र केदार (वय ३५, रा. साकुर, ता. संगमनेर), सागर भीमाजी डोके, (वय २५, रा. साकुर ), अशोक दादा वारे (वय २९, रा. तहाराबाद ता. राहुरी) आणि अनिल धोंडिंबा भालेकर (वय ६१, रा. विठ्ठलवाडी. ता. जुन्नर) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या निर्देशानुसार आणि सहा. वनसंरक्षक मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात वन परीक्षेत्र अधिकारी दीपक पवार, सचिन रघतवान, महेश मेरगेवाड आदींनी सहभाग घेतला.
राहुल पाटील यांना खवले मांजर विक्री होणार असल्याची माहिती समजली होती. त्यानुसार मयूर बोठे यांनी टीमसह मौजे घारगाव (ता. संगमनेर) येथे जाऊन तेथील भानूदास जाधव नावाच्या व्यक्तीला संपर्क केला. त्याने खवले मांजर मौजे साकूर येथे असल्याचे सांगितले. वन अधिकारी त्यांच्यासोबत साकुर येथे गेले. जाधव याने त्यांना खवले मांजर विकणाऱ्याशी भेट घडवून दिली. तेव्हा त्या तिघांना वन अधिकाऱ्यांनी पकडले. त्यातील दोघे तेथून निसटून जात होते. त्यांना साकुर ग्रामस्थांनी पकडून देण्यास मदत केली. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर मोबाईलवर कोणाशी खरेदी-विक्री व्यवहार केला, त्याचा शोध घेतला. त्याचे नाव अनिल भालेकर होते. ते विठ्ठलवाडी (ता. जुन्नर) येथे होते. तिथे जाऊन त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
—————-
तस्करी बंद व्हायला हवी
जगात सर्वाधिक तस्करी होणाऱ्या प्राण्यांमध्ये खवले मांजर आघाडीवर आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमातंर्गत ही प्रजाती अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहे. तरी देखील त्याची तस्करी होते. खवल्या मांजराचे मांस, रक्ताचा उपयोग औषधे तयार करण्यात होतो. तसेच कातडीपासून जॅकेटही बनवले जातात. त्यामुळे याची तस्करी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, ही तस्करी सर्व गैरसमजुतीमधून होत असल्याने ते बंद होणे आवश्यक आहे. त्यासाठी निसर्गप्रेमी, वन विभाग प्रयत्न करत आहे.
—————