जयंत राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:02+5:302021-05-10T04:10:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता राजपूत यांचे पती जयंत राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघांविरुद्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता राजपूत यांचे पती जयंत राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी लॉ कॉलेज रोडवरील कांचन गल्लीतील आयुर्मान नॅचरल हेल्थ केअरच्या कार्यालयात २८ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ९ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
राजेंद्र दत्तात्रय मारणे (वय ४५, रा. मोहननगर, धनकवडी), डॉ. विवेक रसिकराज वायसे (वय ४४, रा. बावधन), बापूर सुंदर मोरे (वय ४०, रा. सिंहगड रोड), बापूराव विनायक पवार (वय ३४, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नीता जयंत राजपूत (वय ५५, रा. सदाशिव पेठ) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
जयंत राजपूत यांचे लॉ कॉलेज रोडवरील कांचन गल्लीत कार्यालय होते. त्यांची बारामतीत औषध कंपनी आहे. त्यांनी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहून ठेवली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत राजपूत यांना व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. डॉ. विवेक वायसे यांच्यामुळे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या व लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी राजपूत यांनी अनेकांकडून हातउसने पैसे घेतले होते. राजेंद्र मारणे हे टेम्पोचालक असून त्यांनी ८ दिवसांत पैसे परत करण्याच्या बोलीवर राजपूत यांना २ लाख रुपये दिले होते. परंतु, त्यांनी ते पैसे परत केले नाही. त्यामुळे मारणे हे टेम्पोचा हप्ता भरू शकले नाही. बँकेने त्यांचा टेम्पो जप्त केला. राजपूत यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. ते फेडू न शकल्याने या फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट बापू मोरे आणि बापूराव पवार
हे राजपूत यांना पैसे परत करण्याबाबत दबाव टाकत होते. या सर्वांच्या धमकाविण्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलिसांनी या सर्व आरोपींचे जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव अधिक तपास करीत आहेत.