राजगड ठाण्याचे चार कर्मचारी निलंबीत; पोलीस निरीक्षकाची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:46+5:302021-02-26T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोर : भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतून दरोड्यातील मोका लावलेले दोन आरोपी गज कापून फरार झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतून दरोड्यातील मोका लावलेले दोन आरोपी गज कापून फरार झाले होते. या आरोपींच्या बंदोबस्तासाठी असलेल्या राजगड पोलीस ठाण्यातील ४ पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई तर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
हवालदार समीर चमनशेख, संतोष खंदारे, अक्षय वायदंडे, कुणाल म्हस्के यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांची बदली करण्यात आली आहे. भोर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी आरोपी पळून गेलेल्या पोलीस कोठडीची पाहणी केली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्र आधिकारी मनोज लोहिया उपविभागीय पोलीस आधिकारी धनंजय पाटील उपस्थित होते. आरोपी फरार झाल्याने पोलिसांचे धाबे दणाणले होते. यामुळे राजगड पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जात आहे.
त्यामुळे ४ पोलीस हवालदार यांचे निलंबन झाले असून पोलीस
निरीक्षक यांची बदली करण्यात आली आहे.
चौकट
चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२, ता. फलटण, जि. सातारा), प्रवीण प्रल्हाद राऊत (वय ३२, रा. चिखली, ता. इंदापूर) या आरोपींनी पलायन केले होते. त्यांच्यावर दरोड्यास १४ गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्यांना पकडायला गेले असताना चंद्रकांत लोखंडेने पोलिसांवरच गोळीबार केला होता. तर प्रवीण राऊत हा यापूर्वी जेलमधून पळून गेला होता. दोघेही रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असून मोका लावलेला आहे.
चौकट
कापूरव्होळ येथे पोलिसांच्या वेशात लुटले होते सराफाला
पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ (ता.भोर) येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करून दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकला होता. त्यानंतर आरोपी चारचाकी गाडीतून पळून गेले होते. या गुन्ह्यात शोध घेत असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला होता. यात एक अधिकारी जखमी झाले होते. राजगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वरील आरोपींना ताब्यात घेतले होते. ९ फेबुवारीपासून गेल्या ८ दिवसांपासून सर्व आरोपींची भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सराईत गुन्हेगार असलेल्या दोघांनी १७ फेब्रुवारी पहाटे लोखंडी गज कापून पलायन केले असून अद्यापही आरोपी फरार आहेत.