वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी वसुल करणार्या चार तोतया पत्रकारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 01:47 PM2022-10-26T13:47:14+5:302022-10-26T13:47:22+5:30
प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्ष्मणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे
पुणे : वृत्तपत्रातून बदनामी करण्याची तसेच खूनाची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी उकळणार्या एका महिलेस ६ तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चौघांना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्ष्मणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच योगेश नागपूरे आणि आत्मज्योतीच्या संपादक संजिवनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश तांबे आणि योगेश नागपूरे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. हा प्रकार केशवनगर येथील दत्त कॉलनीमधील एका गोदामात २३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी यांचे केशवनगर येथील दत्त कॉलनीत गोदाम आहे. प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद हे गोदामात आले. गोदामाच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपूरे, लक्ष्मणसिंग तंवर हे थांबले होते. प्रमोद साळुंखे याने एका इंग्रजी वृत्तपत्र व आत्मज्योती पेपरचा पत्रकार असल्याचे सांगितले. तुमच्या गोदामामध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री करुन दोन नंबरचा धंदा करता. यापूर्वी गुटख्याची विक्री करुन खूप पैसा कमावला आहे. आता पेपरमध्ये बातमी लावून बदनामी करुन पूर्णपणे बरबाद करुन टाकतो. जर पैसे दिले नाही तर खानदानाचा खूनच करुन टाकतो, अशी धमकी दिली. फियार्दी यांच्या मुलाला हाताने मारहाण केली. पत्नी व मुलाला गोदामाच्या बाहेर पडण्यास अटकाव केला. प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद यांनी स्वत:साठी व त्यांचे साथीदार मंगेश तांबे, योगेश नागपूरे, लक्ष्मणसिंग तंवर व आत्मज्योती पेपरच्या संपादक संजिवनी कदम यांच्यासाठी फियार्दी यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी जबरदस्तीने वसुल करुन निघून गेले. फियार्दी हे या प्रकाराने घाबरून गेले होते. त्यांनी मंगळवारी रात्री ही बाब मुंढवा पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन तातडीने आरोपींचा शोध घेऊन मध्यरात्रीनंतर चौघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे अधिक तपास करीत आहेत.