एफटीआयआयचे चार विद्यार्थी बेमुदत उपोषणावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 10:21 IST2019-12-17T10:14:15+5:302019-12-17T10:21:54+5:30
एफटीआयआय'च्या अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फी'मध्ये होणारी दहा टक्के वाढ याच्या निषेधार्थ संस्थेचे चार विद्यार्थी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

एफटीआयआयचे चार विद्यार्थी बेमुदत उपोषणावर
पुणे : एफटीआयआय'च्या अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फी'मध्ये होणारी दहा टक्के वाढ याच्या निषेधार्थ संस्थेचे चार विद्यार्थी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) चे विद्यार्थी हॉस्टेल शुल्कवाढी विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आता हे आंदोलनाचे वारे एफटीआयआयमध्येही शिरले आहेत. एफटीआयआय च्या स्टुडंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, एफटीआयआयमध्ये 2013 नंतर दरवर्षी शैक्षणिक शुल्कामध्ये दहा टक्के वाढ करण्यात येत आहे. 2013 बॅचचे वार्षिक शुल्क 55380 रुपये एवढे होते. मात्र आगामी 2020 बॅच साठी हेच शुल्क 1 लाख 18 हजार 320 रुपयांच्या घरात पोहोचले आहे. अचानक एवढी शुल्कवाढ करण्यात आली आहे. 2018 पासून कोलकाता येथील सत्यजीत रे फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टिट़्यूट आणि एफ टीआयआय पुणे या दोन्ही संस्था संयुक्त प्रवेश प्रक्रिया (जे. ई. टी) राबवितात.
या प्रवेश परीक्षांचे शुल्क देखील या वेळी प्रचंड वाढविण्यात आले आहे . 2015 मध्ये प्रवेश परीक्षा शुल्क 1500 रुपये एवढे होते. 2020 प्रवेश परीक्षेसाठी 10,000 एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्क वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील इच्छुक विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या शुल्क वाढी विरोधात तीन वर्षांपासून आव्हान करून सुद्धा या गोष्टीवर कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरवर्षी १० % शैक्षणिक शुल्क वाढ बंद करण्यात यावी आणि शुल्क कमी करण्यात यावे. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व तोपर्यंत संयुक्त प्रवेश
प्रक्रिया (जे ई टी) बंद करण्यात यावी अशा आमच्या मागण्या असून, जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे उपोषण चालू राहील असा इशारा स्टुडंट असोसिएशनने दिला आहे.