पाटसमध्ये दरोड्याच्या तयारीत असणारे चौघे गजाआड; गावठी पिस्तूलसह काडतुसे, कोयता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:46 PM2023-08-14T20:46:42+5:302023-08-14T20:52:49+5:30
या दरोडेखोरांकडून एक गावठी पिस्तूल, काडतुस, कोयता, कटावणी आणि चार चाकी वाहन असा साडेचार लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे...
पाटस (पुणे) : येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला सोमवारी पहाटे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांकडून एक गावठी पिस्तूल, काडतुस, कोयता, कटावणी आणि चार चाकी वाहन असा साडेचार लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दत्ता अशोक शिंदे (वय २८, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) सचिन लक्ष्मण भोसले (वय ३९, रा. आष्टी, ता. आष्टी, जि. बीड), सचिन संतोष बेलदार (वय २१, रा. येवला, ता. येवला, जि .नाशिक) मल्हार अंबादास अडागळे (वय २४, रा. रवळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी या दरोडेखोरांची नावे आहेत.
पुणे - सोलापूर महामार्गावर पाटस गावच्या हद्दीत सोमवारी पहाटे चौघे सशस्त्र दरोड्याच्या तयारीत होते. दरम्यान, गस्त घालणाऱ्या पोलिसांना दरोडेखोरांची माहिती मिळताच मोठ्या शिताफीने पोलिसांनी या दरोडेखोरांना जेरबंद केले. यावेळी मामा रिकेबी (रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) हा पळून गेला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी काही आरोपी यवत पोलिस स्टेशनअंतर्गत काही गुन्ह्यांमध्ये फरार होते.
आरोपींकडे प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपींनी यवत पोलिस स्टेशन, शिरूर, मिरजगाव पोलिस स्टेशन हद्दीत डीपी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, महिला पोलिस उपनिरीक्षक मीरा मटाले, पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलिस हवालदार संजय देवकाते, नीलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप, अजित काळे, मेघराज जगताप, प्रमोद गायकवाड, महेंद्र चांदणे, राजीव शिंदे, मारूती बाराते, समीर भालेराव यांनी केली आहे.