पुण्यातील आंबेगावात चार शेळ्या, करडू, १० कोंबड्या फस्त करून बिबट्याचा ३१ डिसेंबर साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:39 PM2018-01-01T17:39:05+5:302018-01-01T17:44:19+5:30
निरगुडसर व मेंगडेवाडी परिसरात बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या तसेच एक चार महिन्यांचे शेळीचे करडू व १० कोंबड्या फस्त केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली.
निरगुडसर : निरगुडसर व मेंगडेवाडी परिसरात बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या तसेच एक चार महिन्यांचे शेळीचे करडू व १० कोंबड्या फस्त केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली़ त्यामुळे बिबट्याने जोरदार थर्स्टी फस्ट केल्याची परिसरात चर्चा रंगली आहे़
निरगुडसर-पारगाव रस्त्याच्या नजिक राहणाऱ्या बाबाजी रामचंद्र टाव्हरे यांच्या गायीच्या गोठ्याच्या १० फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला व तीन शेळ्या ठार केल्या. त्यानंतर शेजारील योगेश भीमसेन टाव्हरे यांच्या गोठ्यातील एक शेळी ठार केली व चार महिन्यांचे शेळीचे करडू बिबट्या घेऊन पसार झाला़ त्यानंतर मेंगडेवाडी येथील धनंजय रोहिदास मेंगडे यांच्या दहा कोंबड्यांवर पहाटेच्या सुमारास बिबट्याने ताव मारला. टाव्हरे कुटुंबीय गोठ्यापासून काही अंतरावर राहत असल्याने त्यांना आवाज आला नाही. सकाळी गायींचे दूध काढण्यासाठी सहा वाजता त्यांनी गोठ्यात प्रवेश केला असता चारही शेळ्या मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना बिबट्याचा हल्ला झाल्याचे लक्षात आले़ आजूबाजूला बिबट्याच्या पायांचे ठसे व भिंतीवरून उडी मारताना बिबट्याने केलेल्या कसरतीत भिंतीवर स्पष्ट ठसे उमटलेले दिसले़ सदर घटनेमुळे बाबाजी टाव्हरे यांचे चाळीस हजार रूपयांचे तर योगेश टाव्हरे यांचे वीस हजार रूपयांचे आणि मेंगडेवाडी येथील धनंजय मेंगडे यांचे तीन हजार रूपयांचे नुकसान झाले आहे़
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेरखाने, सुरेश टाव्हरे व डॉ. अतुल साबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व शवविच्छेदन केले़ त्यातील दोन शेळ्या गाभण असल्याचे डॉ़ शेरखाने यांनी सांगितले. वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी सबंधित शेतकऱ्यांनी केली आहे़
वन विभागाचे वनपाल मंगेश गाडे, वनरक्षक सुजाता पाटील, वनमजुर दशरथ मेंगडे यांनी पंचनामा केला असून गेल्या महिनाभरापासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. निरगुडसर पारगाव रस्त्यावर प्रवाशांना रात्रीच्या वेळी बिबट्याने अनेकांना दर्शन दिले आहे. भर वस्तीत बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण झाले असून जवळच भोंडवे वस्तीत लावलेला पिंजरा या परिसरामध्ये हलवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़