खताळपट्टा येथील चार घरे आग लागून खाक
By admin | Published: March 30, 2017 12:09 AM2017-03-30T00:09:14+5:302017-03-30T00:09:14+5:30
ढेकळवाडी (ता. बारामती) परिसरातील खताळपट्टा येथील चार घरे आग लागून खाक झाली आहेत. या आगीमुळे
काटेवाडी : ढेकळवाडी (ता. बारामती) परिसरातील खताळपट्टा येथील चार घरे आग लागून खाक झाली आहेत. या आगीमुळे पावणेसहा लाखांचे नुकसान झाले आहे. तर, या घटनेत ७५ हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली. या परिसरातील देवकरवस्ती येथे चव्हाण कुटुंब राहत आहे. हे कुटुंब मोलमजुरीसह दुग्धव्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. गुढी पाडवाच्या पूर्वसंध्येला विद्युतप्रवाह शॉटसर्किट झाल्याने आग लागली. या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.
या वेळी घरामध्ये विश्रांती घेत असलेले नारायण जाधव यांनी घराला आग लागल्याचे पाहिले. तेव्हा मदतीसाठी आरडाओरड केली. शेजारी असलेले बापूराव त्याच्या मदतीला धावून आले. दोघे मिळून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. आगीची तीव्रता वाढत चालल्याने चारही घरांनी पेट घेतला. यामध्ये महादेव पांडुरंग चव्हाण, बळीराम चव्हाण, ज्योतीराम चव्हाण व भीमराव जाधव यांची घरे आगीच्या विळख्यात सापडली. आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली. काही युवकांनी गोठ्यातील गाई सोडल्या, तसेच बंदिस्त गोठ्याचा दरवाजा मोडून शेळ्या बाहेर काढल्या.
पै-पै करून ही रक्कम साठवली होती. ती कशी परत करणार, अशी चिंता हताश होऊन बसलेले चव्हाण व जाधव कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली. रात्री उशिरा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी भेट देऊन पाहणी केली.
परिस्थिती पाहून त्यांनी तातडीने चारही कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख मदत केली. तसेच, जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, किरण तावरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनीही या कुटुंबांना रोख १० हजार रुपयांची तातडीने मदत केली. (वार्ताहर)