भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:39 IST2025-01-15T13:37:58+5:302025-01-15T13:39:02+5:30

१८ तोळे सोने अडीच किलो चांदीसह,९ लाख १० हजारांची रोकड चोरून एकूण २६ लाख घेऊन चोरटे फरार, शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Four houses were broken into in the settlement in front of Bhor police station, property worth Rs 26 lakhs was looted. | भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास

भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास

भोर : भोर पोलीस स्टेशन समोरच असलेल्या श्रीपतीनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेली चार घरे फोडली.१८ तोळे सोने अडीच किलो चांदीसह,९ लाख १० हजारांची रोकड चोरून एकूण २६ लाख घेऊन चोरटे फरार झाले आहेत. चोरीमुळे शहरातील नागरिकांत घबराट निर्माण झालेली आहे. श्वान पथकाने घरांची पाहणी केली. पुढील तपास भोर पोलिस करीत आहेत.

शहरातील पोलिस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावरील बंद असलेली चार घरे फोडून रविवारी (ता. १२) रात्री ते सोमवारी (ता.१३) पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या. चारही घरे बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती सोमवारी दुपारी घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आहे. शहरातील श्रीपतीनगर येथील भारती दीपक मोरे आणि सविता विलास जेधे, माधव पुरोहित व ऋषीकेश वंजारी यांची बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती मोरे या रविवारी दुपारी कुटुंबासह बाहेरगावी लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास त्या घरी आल्या. त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या कुलुपाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व खोल्यांमधील कपाटांची आणि ड्रॉवरची उलथापालथ केली. दिवाणामधील सामानही काढून फेकून दिले. भारती मोरे यांनी दिवाणाच्या आत कपड्यांमध्ये ६ लाखांची रोकड असलेली पर्स ठेवली होती. त्या पर्समधील पैसे चोरट्यांनी काढून नेले. भारती मोरे यांचा मुलगा परदेशात शिक्षण घेत आहे. त्याला पैसे पाठविण्यासाठी त्यांनी दागिने गहाण ठेवून आणि नातेवाइकांकडून पैसे जमा केले होते.

दुसरी चोरी पोलिस ठाण्यासमोर सविता जेधे यांच्या घरात झाली. त्या सोमवारी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी रविवारी सायंकाळी आपल्या मूळगावी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या घरी आल्यावर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा उचकटलेला आणि दरवाजा उघडा होता. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केलेले दिसले. त्यांच्या कपाटातील लॉकर तोडून छोट्या पाकिटातील ६० हजारांची रोख रक्कम चोरून नेली. तिसरी चोरी माधव पुरोहित यांच्या घरी झाली. घरातील सर्वजण पुण्याला गेले. त्यावेळी चोरांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करून घरातील १८ तोळे सोने, अडीच किलो चांदी आणि ३ लाखाची रोकड चोरून नेली. घरात लग्न समारंभ असल्याने सोने, चांदी बनवून ठेवले होते आणि रोकड आणली होती.

यात्रेच्या काळात चोऱ्यांमध्ये वाढ

मांढरदेवीच्या यात्रेच्या वेळी चोऱ्या होतातच. मांढरदेवीच्या यात्रेच्या कालावधीत भोर शहर आणि मांढरदेवीच्या मार्गावर असलेल्या गावांमधून चोरी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मांढरदेवीच्या यात्रेत गर्दी असल्यामुळे आणि पोलिस हे यात्रेच्या बंदोबस्तासाठी व्यस्त असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. यापूर्वी मांढरदेवीच्या यात्रेच्या काळात बालवडी आणि कासुर्डी गुमा येथे घरफोड्या व चोऱ्या झाल्या आहेत. चोरट्यांच्या मारहाणीत कासुर्डी गुमा येथील एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याची घटना घडली होती.

 

Web Title: Four houses were broken into in the settlement in front of Bhor police station, property worth Rs 26 lakhs was looted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.