दहावीच्या परीक्षेवर राज्यातून चारशे भरारी पथकांची नजर; परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवणार
By प्रशांत बिडवे | Published: February 29, 2024 04:30 PM2024-02-29T16:30:11+5:302024-02-29T16:31:04+5:30
विद्यार्थी, शिक्षकांचे समुपदेशन करूनही काही विद्यार्थी काॅपी करतात हे दुर्देव
पुणे: दहावी परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे २७१ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासह महसूल, ग्रामविकास, पाेलीस दल आणि जिल्हाधिकारी यांनीही स्थानिक पातळीवर पथके नेमली आहेत. राज्यभरात अशी एकुण ४०० भरारी पथकांची परीक्षा कालावधीत हाेणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवणार आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.
गाेसावी म्हणाले, बाेर्डाच्या परीक्षेदरम्यान अपवादात्मक परिस्थितीत केंद्र संचालक स्वत: काॅपी पकडल्याचे दिसून येतात. काॅपीचे गैरप्रकार या भरारी या पथकांमुळेच उघडकीस येतात. भरारी पथक येणार आहे असे बाेलले तरी भंबेरी उडत असते. त्यामुळे निश्चितपणे या भरारी पथकांचा फायदा हाेत असताे.
मंडळाकडून दरवर्षी काॅपी मूक्त परीक्षेचा निर्धार केला जाताे मात्र, तरीही काॅपीचे प्रकार माेठ्या संख्येने उघडकीस येतात या प्रश्नावर उत्तर देताना गाेसावी म्हणाले, परीक्षा उत्तम प्रकारे पार पडावी अशी मंडळाची अपेक्षा असते. मात्र, दरवर्षी १५-१६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. या विद्यार्थी, शिक्षकांचे समुपदेशन करूनही काही विद्यार्थी काॅपी करतात हे दुर्देव आहे. परंतु, काॅपी प्रकरणे उघडकीस येतात हे प्रशासन सक्रीय असल्याचे द्याेतक आहे ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.