जम्बो रुग्णालयामधील चारशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:06 AM2020-12-28T04:06:59+5:302020-12-28T04:06:59+5:30

पुणे : शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयामध्ये कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या सुमारे ४०० परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांकडून सेवेत कायमस्वरूपी घेण्याची ...

Four hundred contract staff at Jumbo Hospital need permanent service | जम्बो रुग्णालयामधील चारशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम सेवा

जम्बो रुग्णालयामधील चारशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम सेवा

Next

पुणे : शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयामध्ये कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या सुमारे ४०० परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांकडून सेवेत कायमस्वरूपी घेण्याची मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे नायडू रुग्णालयासह महापालिकेच्या अन्य रुग्णालयांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायम सेवेची ओढ लागली आहे.

शहरात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली. नायडू रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये परिचारिका, डॉक्टर व इतर कर्मचारी कमी पडू लागल्याने कंत्राटी पध्दतीने भरती सुरू झाली. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ही भरती केली. त्यानंतर जम्बो रुग्णालयाची उभारणी केली. तिथेही डॉक्टरांसह परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने थेट भरती झाली. यामध्ये सहा महिन्यांच्या करारावर सुमारे २०० परिचारिका व १५० ते २०० अन्य कर्मचारी घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात हा करार संपणार आहे. पण आता या कर्मचाºयांनी महापालिकेच्या सेवेत कायम घेण्याची मागणी सुरू केली आहे.

--

जम्बोप्रमाणेच नायडू व रुग्णालयांमध्येही कंत्राटी परिचारिका व इतर कर्मचारी आहे. तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य योजनेंतर्गतही (एनयुएचएम) डॉक्टर, परिचारिका काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचीही सेवेत कायम घेण्याची मागणी आहे. सहा महिन्यांसाठी कंत्राटी तत्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यापुर्वी ‘एनयुएचएम’मधील परिचारिकांचा विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

--

ससून रुग्णालयामध्येही सध्या ९५ परिचारिका व सुमारे २०० इतर कर्मचारी कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. त्यांचा करारही सहा महिन्यांचा असून फेब्रुवारीमध्ये मुदत संपत आहे. त्यापूर्वी सुमारे ११५ परिचारिकांना कंत्राटी पध्दतीने घेतले होते. ससून प्रशासनाकडून भरती करताना थेट कंत्राटदाराची निवड केली. त्यामुळे कंत्राटदारामार्फतच सर्व व्यवहार केले जातात. याउलट महापालिकेने केलेली भरती कोणत्याही कंत्राटदारामार्फत न करता थेट केली आहे. त्यामुळेच कायम सेवेत घेण्याची मागणी होत असल्याचे बोलले जात आहे.

--

आम्हाला ठरल्याप्रमाणे वेतन मिळत नाही. वेतनात कपात केली जात असून ते वेळेतही मिळत नाही, त्यामुळे मोठी नाराजी आहे. आमचे पहिले प्राधान्य सध्या वेतनाला आहे. त्यासाठी आंदोलनही केले आहे. त्याचप्रमाणे कायम सेवेत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

- परिचारिका, जम्बो रुग्णालय

--

सहा महिन्यांसाठी सेवेत घेतले असले तरी आम्ही कोरोना काळात जीव मुठीत धरून काम केले आहे. त्यामुळे काम झाले की आम्हाला सहा महिन्यांतच दुर लोटू नये. पुढेही सेवेची संधी मिळावी.

- परिचारिका, नायडू रुग्णालय

Web Title: Four hundred contract staff at Jumbo Hospital need permanent service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.