पुण्याला दररोज हवाय चारशे टन ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:21+5:302021-04-20T04:11:21+5:30
विशाल शिर्के लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे विभागात सोमवारी ऑक्सिजनची मागणी ...
विशाल शिर्के
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे विभागात सोमवारी ऑक्सिजनची मागणी उच्चांकी ५४३ टनांवर गेली. त्यातील ४०० टन ऑक्सिजनची गरज एकट्या पुणे शहराला आहे. विशेष म्हणजे विभागातील उत्पादनापेक्षा मागणी १२६ टनांनी अधिक आहे.
पुणे विभागात रविवारी रात्रीपर्यंत रुग्णालय अथवा घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार ६०५ इतकी होती. त्यातील १ लाख ३६७ रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातील २६ हजार २६४ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात ३३ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची दैनंदिन गरज वाढत आहे. पुणे विभागात ४१७.१४ टन ऑक्सिजन तयार होतो. मात्र त्या तुलनेत पुणे विभागाची मागणी ५४३ टनांवर गेली आहे. त्यातील चारशे टन ऑक्सिजन एकट्या पुण्यामध्ये आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यात तयार होणाऱ्या ऑक्सिजनच्या तुलनेत २६ टन ऑक्सिजन पुणे जिल्ह्याला अतिरिक्त लागणार आहे. सातारा जिल्ह्यात होणाऱ्या उत्पादनापेक्षा चौपट ऑक्सिजनची आवश्यकता त्यांना वैद्यकीय करणासाठी आहे. सांगलीत तर एकही मोठा प्रकल्प नाही. त्यांची दररोजची ऑक्सिजनची मागणी चाळीस टनांवर पोहोचली आहे.
----
पुणे विभागाची दैनंदिन ऑक्सिजन उत्पादन क्षमता आणि मागणी टनात
जिल्हा उत्पादनक्षमता मागणी
पुणे ३७६ ४००
कोल्हापूर ३१.८० ३२
सातारा ७ ३०
सांगली - ४०
सोलापूर ३ ४१
-----
ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने अत्यावश्यक उत्पादने वगळता उद्योगांचा ऑक्सिजन पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अलिबाग येथील स्टील उद्योगाकडून ऑक्सिजन घेण्यात येत आहे. जेजुरीतील उद्योगातून दोन तीन दिवसात दररोज सात टन ऑक्सिजन उपलब्ध होईल. काही उद्योगांनी त्यांच्या वापराचा ऑक्सिजन देण्याची तयारी दर्शविली आहे. तेथे काही तांत्रिक बदल करावे लागतील.
- सदाशिव सुरवसे, सह संचालक उद्योग
-----
रिफिल उद्योगांचा होणार फायदा
ऑक्सिजन पुरवठा साखळीत मोठ्या उत्पादकांकडून टँकरने ऑक्सिजन घेऊन सिलिंडर मध्ये ऑक्सिजन भरून वितरित करणारी रिफिल उद्योग पुणे विभागात आहेत. त्यांची दैनंदिन क्षमता ३४३.७३ टन आहे. पुणे विभागात २६ उद्योग असून, त्यातील १४ कंपन्या पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे, मुंबई, रत्नागिरी येथून ऑक्सिजन घेऊन वितरित केला जातो. या क्षमतेचा पुरवठा साखळीसाठी खूप उपयोग होणार असल्याचे उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.