सव्वा चारशे CCTV वरून चोरटे जेरबंद; Yamaha RX 100 चोरून विकत होते १५ हजारला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:15 AM2023-06-16T11:15:12+5:302023-06-16T11:15:44+5:30
आर एक्स १०० यामाहाला बाजारात असलेली मागणी पाहून त्याच दुचाकी चोरून ग्रामीण भागात विकल्या, १७ दुचाकी जप्त
पुणे : आर एक्स १०० यामाहा या दुचाकीला बाजारात असलेली मागणी पाहून त्याच दुचाकी चोरून ग्रामीण भागात विकणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने तब्बल १५ दिवस शोध घेऊन जेरबंद केले. त्यासाठी त्यांनी सदाशिव पेठेतून थेट उरळी कांचनपर्यंतच्या चिकाटीने सुमारे सव्वाचारशे सीसीटीव्हींची पडताळणी करून चोरट्यांचा शोध घेतला.
तसेच चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून विश्रामबाग, खडक, लष्कर, फरासखाना, अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७ गुन्हे उघडकीस आले असून साडेचार लाख रुपयांच्या १७ दुचाकी जप्त केल्या आहेत. आदित्य दत्तात्रय मानकर (वय १९, रा. उरळी कांचन), मयूर उर्फ भैय्या पांडुरंग पवार (वय २०, रा. उरळी कांचन) अशी चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. सदाशिव पेठेतील कुमठेकर रोडवरून ३१ मे रोजी दुचाकी चोरीला गेली होती. तेव्हा परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसून येत होते. हा धागा पकडून विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार हर्षल दुडम, मयूर भोसले, आशिष खरात, सत्तापा पाटील यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासात थेट उरुळी कांचनपर्यंत शोध घेतला. त्यातून हे चोरटे तेथून येत असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी इतर वाहनचाेरीची माहिती घेतल्यावर ते यामाहाच चोरत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने, दादा गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलिस हवालदार हर्षल दुडम, कर्मचारी मयूर भोसले, प्रकाश बोरूटे, महावीर वलटे, सागर गोंजारी, आशिष खरात, सत्तापा पाटील यांच्या पथकाने केली.
आर एक्स १०० च का?
चोरटे हे दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी चोरत. हे चोरटे आर एक्स १०० यामाहाचीच चोरी करत असत. या दुचाकीचे मॉडेलचे उत्पादन कंपनीने बंद केले आहे. असे असले तरी त्याची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. तिला चांगली मागणी आहे. त्यामुळेच ते याच दुचाकी चोरत. ग्रामीण भागात १५ ते २० हजार रुपयांना विकत असत. गाडीची कागदपत्रे मागितल्यावर नंतर देऊ, असे सांगत.