अपहरण करून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:56+5:302021-05-19T04:10:56+5:30
पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्याचे चौघांनी अपहरण करून मारहाण करीत सोन्याची अंगठी, घड्याळ, मोबाइल काढून घेत १५ ...
पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्याचे चौघांनी अपहरण करून मारहाण करीत सोन्याची अंगठी, घड्याळ, मोबाइल काढून घेत १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
मोहित वेदपाठक (वय ३२ रा. खराडी, मूळ ता. लोहा, नांदेड, ) अक्षय गिरिगोसावी (वय २७, रा. येरवडा), मारुती नंदू पवार (वय ३४, रा. माले, ता. मुळशी), नरहरी मोतीराम भावेकर (वय ३१, रा. वळणे, सोनारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात गजानन कवटीकवार (वय २८, रा. बालेवाडी) याने दिलेल्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १० ते १२ मे या कालावधीत हा प्रकार घडला.
फिर्यादीच्या बाणेर येथील कार्यालयातून त्यांचे अपहरण केले होते. तेथून मुळशी भागातील शेतात अज्ञात ठिकाणी टेन्टमध्ये डांबून ठेवले होते. तसेच त्याच्याकडे १५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुळशी वळणे येथून चार आरोपींना अटक केली. आरोपींनी फिर्यादींना डांबून ठेवण्यासाठी टेंट कोठून आणला? तसेच फिर्यादीचे एटीएम कार्ड वापरून कोठे रक्कम काढली आहे, गुन्ह्यात आरोपींनी एअरगनचा वापर केला आहे ती कोठून आणली याचा तपास करायचा असल्याने चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली.