चार अपघातांत चार ठार, सात जखमी
By admin | Published: May 23, 2017 05:16 AM2017-05-23T05:16:14+5:302017-05-23T05:16:14+5:30
मुंबई-पुणे महामार्गावर व पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या २४ तासामध्ये अपघाताच्या चारघटना घडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर व पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या २४ तासामध्ये अपघाताच्या चार
घटना घडल्या. त्यामध्ये चार जण ठार झाले असून, सात जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आजचा दिवस अपघातवार ठरला. मुंबई- पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाच्या हद्दीत सकाळी सव्वासहाला झालेल्या मोटारीच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी आहे.
शाहरूख फकिर पठाण (वय २४) व अभिजित दयानंद रणपिसे (वय २२, दोघेही रा. आकुर्डी गावठाण) अशी मृत झालेल्या युवकांची नावे असून, सुमीत मनोहर जाधव (वय २६, रा. आकुर्डी गावठाण) हा युवक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मोटार (एमएच १४ ईपी ५५५०) ही समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रकवर (एमएच २६ एडी १०१५) समोरील बाजूने जोरात धडकून हा अपघात झाला.
यामध्ये मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाल्याने मोटारीमधील चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या आर्यन देवदूत पथकाने शर्तीचे प्रयत्न करुन गाडीचा पत्रा कापून अडकलेले मृतदेह बाहेर काढत जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी दाखल लोणावळा महामार्ग पोलिसांनी वाहतूक नियंत्रणात आणत अपघातग्रस्त वाहने आयआरबीच्या मदतीने बाजूला केली.
देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड येथील गार्डन सिटी परिसरातील केंद्रीय विद्यालयाजवळ शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव रिक्षाला ओव्हरटेक करीत
आलेल्या एका मोटारीने रिक्षाला धडक देऊन रिक्षातील एकाच कुटुंबातील तिघांना जखमी केले आहे. जखमींवर देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुधीर ताराचंद खंडारे (वय 32), शालू सुधीर खंडारे (वय 30), सुशांत सुधीर खंडारे (वय 8, सर्व रा. विकासनगर, देहूरोड) असे अपघातात जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. अपघातात शालू खंडारे यांना डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरूअसून, सुशांत या आठ वर्षांच्या मुलाच्या हाताला जखम झाली आहे. तसेच सुधीर खंडारे यांना दोन्ही पायांना मार लागला असून, त्यांच्यावर देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड केंद्रीय विद्यालयाजवळ शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुधीर खंडारे हे पत्नी, मुलगा व मुलीसह रिक्षामधून (एमएच १२ एचसी ६५२३) निगडीकडून विकासनगरकडे येत असताना रिक्षाला ओव्हरटेक करीत भरधाव मोटारीने (एमएच १४ एचझेड १३७६) रिक्षाला धडक दिली. यात तिघे जखमी झाले आहेत.
मोटारीसह संबंधित चालक फरार झाला आहे. अपघातात पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.