Pune: चांडोलीमध्ये चार बिबट्यामुळे भीतीचे वातावरण, पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:04 PM2023-12-20T13:04:08+5:302023-12-20T13:13:31+5:30
चांडोली बुद्रुक गावामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. उसाची तोड सुरू झाल्यामुळे बिबटे आता रस्त्यावर येऊ लागले आहेत...
मंचर (पुणे) : चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वेताळ मळ्यामध्ये चार बिबट्यांचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप थोरात व लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय केदार यांनी केली आहे.
चांडोली बुद्रुक गावामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. उसाची तोड सुरू झाल्यामुळे बिबटे आता रस्त्यावर येऊ लागले आहेत. वेताळ मळ्यातील वेताळ मंदिराजवळ सायंकाळी सहा वाजता अनिल थोरात व प्रतीक थोरात हे चारचाकी वाहनातून कळंबवरून चांडोलीकडे येत असताना दोन बिबटे रस्त्यावर बसलेले त्यांना दिसले. त्यांनी गाडी थांबवली हॉर्न वाजवल्यानंतर बिबटे उसाच्या शेतात निघून गेले. पुढे गेल्यावर वेताळ मळ्यातील वेशीजवळ परत दोन बिबटे रस्ता ओलांडताना त्यांना आढळून आले. म्हणजे एकूण चार बिबटे परिसरामध्ये फिरत आहेत.
यापूर्वी देखील बिबट्यांनी दुचाकीस्वारांवर अनेक वेळा हल्ले करून अनेक नागरिकांना जखमी केले आहे. दोनच दिवसांपूर्वी कळंब येथे माळी मळ्यामध्ये एका बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वन विभागाला यश आले होते. परंतु राहिलेले बिबटे हे आता चांडोली हद्दीमध्ये ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकाला पाणी द्यावे लागते शेतकऱ्यांवर हल्ला होण्याच्या अगोदर वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात यांनी केली आहे. बिबट्याच्या वावरामुळे त्याचा परिणाम शेतीच्या कामावर झाला आहे.