महाराष्ट्राच्या चौघांना सुवर्ण
By admin | Published: July 4, 2017 04:14 AM2017-07-04T04:14:14+5:302017-07-04T04:14:14+5:30
भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ४४व्या राष्ट्रीय ज्युनिअर जलतरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित ४४व्या राष्ट्रीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता, कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु यांनी विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. मिहीर आंब्रे, आर्या राजगुरू, रेना सलडाना या महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही सोमवारी महाराष्ट्राला सुवर्णयश मिळवून दिले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महिला गटात महाराष्ट्राच्या रेना सलडानाने २ मिनिटे ११.०२ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या अॅनी जैनने रौप्य पदक पटकावले तर कर्नाटकच्या मयुरी लिंगराज व महाराष्ट्रच्या साध्वी धुरी यांनी २.१४.०९ मिनिट वेळेसह संयुक्तरीत्या कांस्यपदक मिळवले. मुलींच्या १३ ते १४ वर्षे वयोगटात कर्नाटकच्या खुशी दिनेशने २.१२.८३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक संपादन केले. महाराष्ट्राच्या आकांक्षा शहाने कांस्यपदक पटकावले.
२०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मुलांच्या १३ ते १४ वर्षे वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने २ मिनिटे २८.८७ सेकंदासह सुवर्णपदक संपादन केले. स्वदेशने कर्नाटकच्या लिखित एस.पी याचा २ मिनिअे २९.४८ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ताने २ मिनिटे ५१.९४ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. तिने २०१५चा कर्नाटकच्या सलोनी दलालचा २.५२.२९ सेकंदाचा विक्रम मागे टाकला.
५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या १५ ते १७ वर्षे वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने २६.९० सेकांद वेळेसह विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. मुलांच्या १३ ते १४ वर्षे वयोगटात दिल्लीच्या तन्मय दासने २८.९३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले.
५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात महिला गटात तामिळनाडूच्या जान्हवी आर. हिने ३१.७५ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या १५ ते १७ वयोगटात महाराष्ट्रच्या मिहिर आंब्रेने २५.८८ सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. मिहिर बालशिक्षण मंदिर येथे बारावी सायन्स शाखेत शिकत असून चॅम्पियन्स क्लबमध्ये विनय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. महाराष्ट्राच्या नील रॉय व तामिळनाडूच्या आदित्य डी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. याच वयोगटात मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या आर्या राजगुरूने २९.५६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले.
१३ ते १४ वर्षे वयोगटात कर्नाटकच्या तनिश मॉथ्युने २६.६८ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने ३०.१७ सेकंद वेळ नोंदवत
बाजी मारली.
स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष दिगंबर कामत, एएसआय कमांडंट राकेश यादव, ग्लेनमार्क फार्मासिटिकल्सचे सीएमडी ग्लेन सलडाना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वीमिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आणि महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, सचिव जुबिम अमेरिया व भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी उपस्थित होते.
निकाल :
२०० मीटर फ्रीस्टाईल मुली : १५ ते १७ वर्षे : रेना सलडाना (महाराष्ट्र, २ मिनिटे ११.0२ सेकंद), अॅनी जैन (मध्य प्रदेश, २.१४.0५), मयुरी लिंगराज (कर्नाटक) / साध्वी धुरी (महाराष्ट्र, २.१४.0९).
२00 मीटर फ्रीस्टाईल मुली : १३ ते १४ वर्षे : खुशी दिनेश (कर्नाटक, २ मिनिटे १२.८३ सेकंद), आस्था चौधरी (आसाम, २.१३.७६), आकांक्षा शहा (महाराष्ट्र, २.१७.१६).
२00 मीटर ब्रेस्टस्ट्रोक मुली : १३ ते १४ वर्षे : केनिशा गुप्ता (महाराष्ट्र, २ मिनिटे ५१.९४ सेकंद), आदिती बालाजी (एसएफआय, २.५२.२६), रचना एस. आर. राव (कर्नाटक, २.५२.९३).
५0 मीटर बॅकस्ट्रोक : मुले : १५ ते १७ वर्षे : श्रीहरी नटराज (कर्नाटक, २६.९0 सेकंद), झेवीअर डिसुझा (गोवा, २७.४५), सौम्यजीत साहा (पश्चिम बंगाल, २८.४२).
५0 मीटर बॅकस्ट्रोक : मुले : १३ ते १४ वर्षे : तन्मय दास (दिल्ली, २८.९३ सेकंद), शिवांश सिंग (कर्नाटक, २९.८६), अक्षदिप सिंग(पंजाब, ३0.११).
५0 मीटर बॅकस्ट्रोक : मुली: १५ ते १७ वर्षे : जान्हवी आर. (तमिळनाडू, ३१.७५ सेकंद), जहंती राजेश (कर्नाटक, ३२.३७), खुशी जौन (हरयाणा, ३२.५१).
५0 मीटर बटरफ्लाय : मुले : १५ ते १७ वर्षे : मिहिर आंब्रे (महाराष्ट्र, २५.८८ सेकंद), नील रॉय (महाराष्ट्र, २६.२७), आदित्य डी. (तमिळनाडू, २६.२८).
५0 मीटर बटरफ्लाय : १३ ते १४ वर्षे मुले : तनिश मॉथ्यू (कर्नाटक, २६.६८ सेकंद), विकास पी. (तमिळनाडू, २६.९९), प्रसिध्द कृष्णा पी.ए. (कर्नाटक, २७.६0).
५0 मीटर बटरफ्लाय : १५ ते १७ वर्षे मुली : आर्या राजगुरू (महाराष्ट्र, २९.५६ सेकंद), मयुरी लिंगराज (कर्नाटक, २९.८६), साध्वी धुरी (महाराष्ट्र, २९.९३).
५0 मीटर बटरफ्लाय : १३ ते १४ वर्षे मुली :
केनिशा गुप्ता (महाराष्ट्र, ३0.१७ सेकंद), लियाना
उमेर (केरळ, ३0.४८), उत्तरा गोगाई (आसाम,
३0.८0).